अल्पवयीन मुलीचे पोलिसांसमोरून अपहरण

अक्षम्य हलगर्जीपणा : आईची नजर चुकवून तरूणीला ससूनमधून पुन्हा पळविले

पिंपरी – अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला औषधोपचारासाठी ससून रुग्णालयात आणले असताना तिला पुन्हा ससूनमधून कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी समोर आला आहे. ससून रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोरच अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याने पोलिसांच्या अब्रूची लक्‍तरे वेशीला टांगली आहेत. पोलीस आणि तरूणीच्या आईला गुंगारा देऊन तरूणीचे दुसऱ्यांदा अपहरण झाले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना पुणे शहरात घडली असून, याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 एप्रिल रोजी एका 16 वर्षीय मुलीचे एका तरुणाने अपहरण केले. घरच्यांनी याप्रकरणी तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञाताविरोधात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळाची पाहणी करत कसून चौकशी केली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत एका तरुणाला 7 एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते आणि मुलीची सुटका केली होती. या प्रकरणी आरोपीवर कारवाई करत त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मुलीला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय तपासण्या झाल्या. दरम्यान तिचा रक्तदाब (बीपी) अतिशय कमी झाला असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. डॉक्‍टरांनी मुलीला पुन्हा काही दिवसांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. त्यानुसार मुलीला काही दिवसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलीवर आवश्‍यक उपचार आणि वैद्यकीय तपासण्या झाल्या.

उपचार पूर्ण झाल्यानंतर तिला ससून रुग्णालयातून (दि. 29 मे) रोजी डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्याने मुलगी तिच्या आईसोबत रुग्णालयाबाहेर पडली. यावेळी पोलिसही सोबत होते. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या औषधांच्या दुकानात मुलीची आई औषधे घेण्यासाठी गेली. त्यावेळी मुलगी औषधांच्या दुकानाजवळ थांबली होती. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्या मुलीचे पुन्हा अपहरण केले. आई औषधे घेऊन आली असता मुलगी तिला दिसली नाही. आईने रुग्णालय परिसरात सर्वत्र मुलीचा शोध घेतला. मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर देखील मुलगी सापडत नसल्याने अखेर बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत पुन्हा मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला.

एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून दुर्लक्ष नाही – कुंटे
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे म्हणाले, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता. त्यामध्ये पोलिसांनी आरोपीला शोधून त्याला अटक करत त्याची तुरुंगात रवानगी केली. मुलीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर डॉक्‍टरांनी मुलीला फेरतपासणी तसेच पुढील वैद्यकीय उपचारासाठी पुन्हा बोलावले होते. उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून मुलीला डिस्चार्ज मिळाला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर आल्यावर हा अपहरणाचा प्रकार घडला आहे. यामध्ये एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून दुर्लक्ष होण्याचा प्रकार नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×