मोबाईलवरून येणाऱ्या धमक्‍यांना वैतागून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

शेवगाव: वारंवार मोबाईलवरून येणाऱ्या धमक्‍यामुळे असह्य झालेल्या एका अल्पवयीन मुलीने अखेर गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली. या संदर्भात छेडछाड करणे, आत्महत्येस प्रवृत्त तसेच बाल लैगिंक अत्याचार संरक्षण अधिनियम कलमांतर्गत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन शेवगाव पोलिसात अरुण शहादेव ढाकणे (रा.हसनापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद दाखल करून घेण्यासाठी त्या महिलेला थेट नगरला पोलिस मुख्यालयात जावून पोलिस अधिक्षक इशू सिंधू यांच्यासमोर आपली कैफियत मांडावी लागली.

तालुक्‍यातील हसनापुर येथे इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने 1 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता आत्महत्या केली. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सुमारे तीन महिन्यापूर्वी मी घरकाम करत असताना मुलगीला फोनवर बोलताना पाहिले. त्यावेळी तू कोणाशी बोलत आहे, मोबाईल कुणाचा आहे असे विचारले असता मी गावातील अरुण ढाकणे याच्याशी बोलत होते व मोबाईल त्यानेच घेऊन दिला आहे. असे तिने सांगितले. आम्ही तिच्याकडील मोबाईल काढून घेतला व तिला समजावले. त्यानंतर माझे पती व दीर यांनी अरुण ढाकणे याचे वडील शहादेव ढाकणे यांच्याकडे गेले ते म्हणाले की मी माझ्या मुलाला समजावून सांगतो, तुम्ही केस केली तर त्याला नोकरी लागणार नाही, तुमच्या मुलीला माझा मुलगा त्रास देणार नाही. याची मी खबरदारी घेईन, अशी विनवणी केल्याने केस केली नाही. त्यानंतर काही दिवस अरुण याने फोन केला नाही, मात्र एक दिवस रात्री 12 वाजता माझ्या पतीच्या मोबाईलवर अरुण याने फोन करून मुलशी बोलू लागला.

मुलगी कुणाशी तरी बोलत आहे, हा आवाज ऐकल्याने मी जागी झाले व तिला विचारणा केली असता तिने अरुण याच्याशी बोलत होते असे सांगितले. या घटनेनंतर मुलीला मामाच्या गावी ठेवले, परंतु तिची परीक्षा असल्याने काही दिवसांपूर्वी ती पुन्हा हसनापुर येथे आली.

दि.1 मे रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ती नवीन मोबाईलवर बोलताना दिसली. तेव्हा तिने अरुण याच्या बरोबर बोलत होते. त्याने मोबाईल घेऊन दिला असून तो मला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे सांगितले. मी तो मोबाईल घेवून घराशेजारी असलेल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले. काही वेळाने परत आले. तेव्हा मुलगी घरातील अँगलला लटकलेली दिसली. तिने स्वत:च्या ओढणीने गळफास घेतला होता. याबाबत शेवगाव पोलिसांकडे तक्रार केली. त्याचा मोबाईल व त्यावर दिलेल्या धमक्‍याचे रेकॉर्डींग तपासून तक्रार दाखल करण्याची विनवणी केली, परंतु त्यांनी दाखल घेतली नाही. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांची नगरला जावून भेट घेवून कैफियत मांडल्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार हा गुन्हा दाखल झाला. अशी माहिती मुलीच्या नातेवाईकांनी पत्रकारांना दिली. अद्याप आरोपीस अटक नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.