पुणे : पुणे शहरातील पोर्शे कारचे प्रकरण देशभर गाजले होते. यामध्ये अल्पवीन मुलाने केलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही बड्या बापाची धेंडे सुधारण्याचे नाव घेण्यास तयार नाही. अशाच एका प्रकरणात महाविद्यालय परिसरात भरधाव वेगाने रेंज रोव्हर गाडी चालविणाऱ्या एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन वडिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंहगड महाविद्यालयाच्या वडगाव येथील कँम्पसमध्ये घडली.
याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार व्यवसायीक महेश प्रकाश बिडकर (वय ४७, रा.शिवसागर, सनसिटी) यांच्याविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सचिन घोरपडे हे सिंहगड पोलीस ठाण्याअंतर्गत कॉप्स २४ मार्शल म्हणून कार्यरत आहेत. ते सहकाऱ्यांसह गुरुवारी रात्री वडगाव येथे गस्त घातल होते.
तेव्हा त्यांना सिंहगड महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये रेंज रोव्हर गाडी भरधाव वेगाने जा-ये करताना दिसली, त्यांनी गाडी अडवून चालकास विचारणा केली असता, तो अल्पवयीन असल्याचे आढळले. या गाडीमध्ये दोन अल्पवीन मुलेही होती. गाडीसंदर्भात चौकशी केली असता ही गाडी त्याच्या मृत आजोबांच्या नावावर असल्याचे लक्षात आले. तसेच, गाडीचा वापर त्याचे वडील महेश बिडकर करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधिन करण्यात आले.