स्वच्छ सर्वेक्षणातून ठरवणार जिल्ह्यांचे ‘गुणांकन’

1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान होणार सर्वेक्षण

स्वच्छतेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – भारत सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण या संस्थेमार्फत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018′ हा देशव्यापी कार्यक्रम आयोजित केला आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2018 दरम्यान हे सर्वेक्षण होणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने तीन जिल्ह्यांना स्वच्छतेचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांत “स्वच्छ भारत मिशन’ला जोमाने सुरुवात झाली आहे.

या सर्वेक्षणात भारतातील सर्व जिल्ह्यांचे प्रामुख्याने तीन मानकांच्या आधारे जिल्ह्यातील आणि गावातील स्वच्छता, स्वच्छतेशी निगडीत कामांचे गुणवत्ता, संख्याबळ लक्षात घेऊन स्वतंत्र संस्थेमार्फत क्रमांक ठरविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील काही गावांमधील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे येथे निरीक्षण करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेविषयी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची स्वच्छतेतील समज आणि मते घेतली जातील आणि “स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) कार्यक्रमाच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधारही यासाठी घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून भारतातील जिल्ह्यांचे आणि राज्याचे स्वच्छतेतील स्थान आणि क्रमवारी निश्‍चित होणार आहे. त्यानुसार पहिले तीन जिल्हे आणि राज्य यांना 2 ऑक्‍टोबर रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

या सर्वेक्षणामध्ये सार्वजनिक जागेवरील शौचालय उपलब्धता आणि वापर, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याचे निरीक्षण होणार आहे. नागरिकांचे स्वच्छतेबाबत माहिती, मते घेणार, स्वच्छतेसंबंधी जिल्ह्याने किंवा राज्याने केलेली प्रगती, सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे थेट निरीक्षण तसेच गावकऱ्यांच्या वैयक्तीक शौचालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने याबाबत नागरिकांचे गाव बैठक, गटचर्चा, वैयक्तीक भेटी यासह ऑनलाईन पध्दतीने अभिप्राय घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण काटेकोरपणे होणार असून, सर्व जिल्ह्यांनी तयारीला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)