पुणे : कॉंग्रेसच्या काळात सत्तेत असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाले, तर ते राजीनामा देत. त्यांची आजपर्यंत अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेतला गेला पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता शुक्रवारी त्यांच्यावर बोचरी टीका केली. एक महिन्यांहून अधिक काळ हे प्रकरण सुरू असताना देखील संवेदनशील घटनेच्या बाबत विरोधकांनी सरकारला हे सांगायला हवे का, असा प्रश्नही सुळे यांनी विचारला आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले पेठेतील वाड्यात अभिवादन करण्यासाठी सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बीड आणि परभणी येथील घटना अवस्थ करणारी आहे. माणुसकी विरुद्ध विकृती अशी ही घटना असून त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांचा निषेध केला जात आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. शरद पवार यांच्याही आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर यावर निर्णय घेतला आहे. सगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले असते, तर त्याला राजकीय वळण लागले नसते.
आता या घटनेची “एसआयटी’मार्फत चौकशी लावण्यात आली आहे, असे सुळे यांनी नमूद केले. चाकण येथे एका कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर होते याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, भुजबळ परिवाराशी आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. आमच्यात कधीही अंतर राहिलेले नाही. आम्हीही त्यामध्ये कधीही राजकारण आणले नाही आणि आणणार नाही.
राज्यात सत्ता येऊनही अनेक मंत्र्यांनी अद्याप खात्याच्या कारभार स्वीकारलेला नाही, त्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, सरकारमध्ये सध्या एकच माणूस ॲटीव्ह आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ काय आहे, तो सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे.
लाडकी बहिण योजना, मुंब्रा येथील घटना, काश्मीरचे नाव बदलाचा प्रस्ताव आदी विषयांवरही सुळे यांनी भाष्य केले.