पंतप्रधान मोदींसह मंत्री आणि व्हीआयपीही घेणार लस

नवी दिल्ली – करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. तसेच वयाची पन्नाशी गाठलेल्या सर्व आमदार आणि खासदारांनाही करोनाची लस देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस दिली गेली आहे. आता लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वयाच्या 50 च्या पुढच्या नागरिकांना करोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे पन्नाशीच्या पुढील सर्व खासदार आणि आमदारांना करोनाची लस टोचण्यात येणार आहे. या टप्प्यात स्वत: मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही लस टोचून घेणार आहेत.

देशात 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरू झालं आहे. सुमारे 7 लाख आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात लष्कर, अर्धसैनिक दलाचे जवानांनाही लस देण्यात येणार आहे. दुसरा टप्पा कधी सुरू होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात सर्व राज्यांचे राज्यपाल आणि बहुतेक राज्यांचे मुख्यमंत्री लस टोचून घेणार आहेत. शिवाय अनेक व्हीआयपींनाही करोनाची लस टोचण्यात येणार आहे.

दरम्यान, कोणत्या टप्प्यात कोणती लस टोचायची हे राज्य सरकारने ठरवायचं असल्याचं केंद्राने आधीच स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये करोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर दिल्ली आणि पंजाबसहित अनेक राज्यातील लोक लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसत असून त्यांचं समुपदेशन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

लसीबाबत संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहे. त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवाही पसरत असल्यामुळे गोंधळाची स्थिती आहे. अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. तरीपण काही भागांत अजुनही लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.