रत्नागिरी – घृणास्पद मजकूर प्रसिद्ध करून बदनामी करून दहा लाख रुपयाची मागणी महाविकास आघाडीच्या मंत्र्यास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांची बदनामी करत त्यांना धमकीचा फोन येत असल्याची फिर्याद सामंत यांचे स्वीय सहाय्यक व भाऊ महेश सामंत यांनी रत्नागिरी पोलिसात दाखल केली आहे.
या प्रकरणी प्रदीप भालेकर जयहिंद न्यूज चॅनल मुंबई यांच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयहिंद चॅनलद्वारे खोट्या बातम्या तयार करून समाजमाध्यमांद्वारे मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांची बदनामी करणाऱ्या मजकुराच्या बातम्या पाठवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की किरण सामंत यांच्या मोबाईलवर प्रदीप भालेकर जयहिंद न्यूज चॅनल मुंबई याने फोन करून किरण सामंत यांना आपल्याकडील बांधकाम व्यवसायातील कामे मला द्या असे सांगितले .
भालेकर यांनी मनात राग धरून जयहिंद चॅनलमधून खोट्या बातम्या तयार करून समाजमाध्यमांद्वारे आमदार उदय सामंत व किरण सामंत यांची बदनामी करू असे वक्तव्य करून फिर्यादी महेश सामंत यांचे सहकारी मनिष मोरे यांच्या मोबाइल फोनकॉल व व्हॉट्सअॅपवर कॉल करून व्हॉट्सअॅपच्या नंबरवर मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांच्याबदल बदनामी करणारा अत्यंत घृणास्पद मजकूर पाठवला.
त्यानंतर दहा लाख रुपयाची मागणी करून खोटा व बदनामीकारक मजकूर छापून समाजातील मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांची प्रतिमा बिघडवून टाकेन अशी धमकी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.