यवतमाळ : विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले असताना महायुतीमधील धुसफूस समोर येताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री संजय राठोड यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘राज्याच्या सहकार क्षेत्रात बिना भ्रष्टाचार, नहीं सहकार’ अशी स्थिती आहे, असा गंभीर आरोप जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा आरोप वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष केला आहे.
नेमके काय म्हणाले संजय राठोड?
जसे प्रामाणिक सहकारी संस्थांना सरकार उभारी देण्याचा प्रयत्न करते तसेच बदमाशी करणाऱ्यांसाठी कडक कायदे करावे आणि त्यांना सरकारने दिलेली मदत सरकार जमा करण्याचे धोरण आणावे, अशी मागणी राठोड यांनी केली. एक सूतगिरणी 1991 साली चालू झाली, त्यांनी वेळोवेळी सरकारकडून कोट्यवधींची मदत मिळविली, शेतकरी सभासदांचे भागभांडवल आणि शासनाचे 30 कोटी रुपये घेऊनही सूतगिरणी सुरु केली नाही. आणि पैसेही परत दिले नाही, असा आरोप संजय राठोड यांनी केला. त्यामुळे राज्यातील मंत्र्याने आपल्याच सरकारमधील मंत्रालयाबाबत केलेल्या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली.