दिव्यांग कल्याणकारी योजनांवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्यमंत्र्यांनी फटकारले

आयुक्तांवर असंवेदनशीलतेचा ठपका; ऐवले यांच्या पदोन्नतीवरूनही सुनावले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अपंग, दिव्यांग कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांना चांगलेच फटकारल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांना सहायक आयुक्त करावयाच्या ठरावाला वर्षभरापूर्वी मान्यता दिल्यानंतरही या ठरावाची अंमलबजावणी न केल्याच्या प्रकारावरून आयुक्तांना सुनावल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यातील प्रत्येक महापालिकेने दिव्यांग बांधावांचे विषय हाताळण्याची जबाबदारी संबंधित महापालिकेतील एका उपायुक्तांवर सोपवावी, असा आदेश राज्य शासनाने 14 नोव्हेंबर 2017 रोजी काढला आहे. पिंपरी महापालिकेत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. महापालिकेमध्ये पूर्वी सहायक आयुक्त हेच पद उपायुक्त पदाशी समकक्ष असल्याने समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांना सहायक आयुक्त करण्यास सर्वसाधारण सभेने गतवर्षी जानेवारी महिन्यात मान्यता दिली. मात्र त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी अद्यापपर्यंत केलेली नाही.

अपंग व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 13) मुंबई येथे मंत्रालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. आयुक्त हर्डीकर यांनी अपंगांसाठीच्या योजना राबविण्यासाठी शासनाच्या ठरावानुसार स्वतंत्र अधिकारी नेमलेला नाही. त्यामुळे दिव्यांगांच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याची तक्रारी त्यांनी केली. त्यावर बच्चू कडू यांनी तातडीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भ्रमणध्वणीद्वारे संपर्क साधून त्यांचा खरपूस समाचार घेतला.

ठराव क्रमांक 499 ची आजपर्यंत अंमलबजावणी का केली नाही? दिव्यांगांच्या योजना राबविण्यासंदर्भात आपण अतिशय असंवेदनशील असल्याचा ठपका त्यांनी आयुक्तांवर ठेवला. ठराव 499 ची अंमलबजावणी करून दिव्यांगांच्या योजना राबविण्यासाठी समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांना सहायक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात यावी. याचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला आपण भेट देणार असल्याचे बच्चू कडू यांनी आयुक्तांना सुनावले, अशी माहिती संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी सांगितली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केवळ सल्लागार नेमण्यात आणि टक्केवारीत रस आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष करून त्यावर अधिकाऱ्याची नेमणूक केली. परंतु, संबंधिताकडे तीन ते चार विभागाचा पदभार आहे. त्यांच्याकडून अपंगांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अपंगांची हेळसांड होत आहे.
– दत्तात्रय भोसले, शहराध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.