राज्यमंत्री दिलीप कांबळेची हकालपट्टी करा! 

कॉंग्रेस प्रवक्‍त्यांची मागणी; दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोप 
मुंबई  – “चौकीदार चोर है’ ही घोषणा सार्थ ठरली असून दारू दुकानाचा परवाना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच स्वीकारल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेले सामान्य न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीसांनी तात्काळ अटक करावी, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ म्हणजे अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी असल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

दारू दुकानाचा परवाना देण्यासाठी 2 कोटी 15 लाख रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून औरंगाबाद जिल्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सचिन सावंत यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. राज्याचा मंत्री सरकारी निवासस्थानातून आपले हस्तक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या साथीने राजरोसपणे दारू दुकानाचा परवाना देण्याकरिता 2.15 कोटी रूपये लाच मागितली, अशी तक्रार औरंगाबाद येथील फिर्यादी विलास चव्हाण यांनी केली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर चार वेळा मंत्री भेटले व त्यांनी लाचेची मागणी केली असेही या तक्रारीत म्हटले आहे. सदर मंत्र्यांच्या हस्तकांच्या खात्यावरही लाचेचे पैसे आले आहेत. तसेच दिलीप कांबळेंचे खासगी सचिव मनाळे यांनी 60 लाख रूपये लाचेची रक्कम कांबळे यांच्या निवासस्थानी स्विकारली. तसेच फिर्यादीच्या पत्नींच्या मालकीच्या हॉटेल माथेरानच्या बॅंक खात्यातूनही दिलीप कांबळे यांच्या खात्यावर 10 लाख रूपये लाचेची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचा आरोपही सांवत यांनी केला.

न्यायालयाने याची दखल घेतल्यामुळे दिलीप कांबळे यांच्यासह चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फक्त गुन्हा नोंद करून चालणार नाही तर पोलिसांनी तात्काळ मंत्री दिलीप कांबळे यांना अटक केली पाहिजे अन्यथा ते फिर्यादीवर दबाव आणू शकतात, अशी भीती व्यक्त करतानाच लाचखोर मंत्र्यांना सोबत घेऊन सरकार चालवत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी टीका सावंत यांनी केली

निवडणूकीच्या तोंडावर बदनामीचा प्रकार – कांबळे

निवडणुकीच्या तोंडावर माझी आणि पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीला आपण कधीही भेटलेलो नाही. याविषयाशी माझा संबंध नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार मी उघड केला होता. त्याचा राग मनात धरून माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात न्यायालयात मी तक्रार अर्ज केला आहे, असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.