– नीलकंठ मोहिते
रेडा : भरणेवाडी (तालुका इंदापूर) येथे तालुक्यातील 41 नवनिर्वाचित सरपंचांची ओळख परेड सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात स्वतः करून दाखवली. त्यामुळे शनिवारी भाजपने 37 सरपंच आमच्या विचारांचे असल्याची केलेली वल्गना फोल ठरली आहे.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे बोलताना म्हणाले की, गेली पंचवीस वर्षे, इंदापूर तालुक्यातील जनतेला खोटे बोलण्याचा धंदा विरोधकांनी केला. आताही केवळ तीन सरपंचांचा सत्कार करून, एकूण ३८ सरपंच आपल्या विचाराचे असल्याचा दावा केला होता. त्यामुळे विरोधकांचा खोटेपणा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर मोडीत काढून, 41 सरपंच मोजून दाखवले, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भरणेवाडी येथील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी, तालुक्यातील नवनिर्वाचित 41 सरपंचांचा जाहीर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, गेल्या 35 वर्षापासून शेतीच्या पाण्याचा प्रश्न इंदापूर तालुक्यामध्ये सुटलेला नाही. तरीदेखील शेतीसाठी पाणी न मिळणाऱ्या भागातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळेच 22 गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना आणि उजनीतून शेतकऱ्यांना पाणी हक्काचे उपलब्ध होणार आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या प्रश्न लवकर निकाली काढण्याच्या सूचना केल्याचे भरणे यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या विचाराच्या 41 ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतीने व विरोधी निवडून आलेल्या देखील इतर ग्रामपंचायतीने आपल्या गावाच्या विकासाचा आराखडा अत्यंत हुशारीने निर्माण करावा. एकाही गावाला विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन राज्यमंत्री भरणे यांनी दिले.
41 सरपंचांची ओळख परेड
इंदापूर तालुक्यातील साठ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या. यापैकी 41 सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत. सर्व 41 सरपंच यांची ओळख परेड राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावाचे नाव घेत, सरपंचांचे नाव घेत उपस्थित जनसमुदायासमोर ओळख परेड करून दाखवली. यामध्ये सपकळवाडी, पोंधवडी, लोणी देवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथूर्णे, रुई, बळपुडी, भांडगाव, हगारवाडी, काटी, कळस, तक्रारवाडी, लासुर्णे, शेटफळगडे, पिंपरी बुद्रुक, शहा, निमसाखर, सणसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी, सरडेवाडी, कौठळी, जाचक वस्ती, जाधवाडी, दगडवाडी, पिठेवाडी, अकोले, तरंगवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे स्वागत केले.
दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश
इंदापूर तालुक्यातील जाधववाडी तसेच तक्रारवाडी येथील सरपंच व निमसाखर गावचे उपसरपंच यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रवेश करून घेतला.