सुपा (वार्ताहर) – पारनेर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच मंगळवारपासून रात्री 11 ते सकाळी 9, असा विद्युतपुरवठा शेतीपंपांसाठी केला जात आहे.
तोही कमी दाबाने असल्यामुळे मेन लाइनच्या तारा तुटणे, जंप जळणे, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बिबट्याच्या दहशतीखाली रात्र रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मंत्री साहेब, दिवसा नाही, तर रात्रीतरी पूर्ण दाबाने वीज द्या, अशी मागणी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.
सुपा जिरायती पट्ट्यात डाळिंब, सीताफळ, संत्रा, मोसंबीसह ऊस, ज्वारीचे क्षेत्रही वाढत आहे. त्याचबरोबर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलही वाढत आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत बिबट्यांचे दर्शन होत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरी, तलाव व बंधारे तुडुंब भरलेले आहेत. कधी नव्हे तर यंदा दीपावलीनंतरही अनेक ठिकाणी ओढे नाले वाहात आहेत. तसेच रब्बी हंगामातील पिकेही जोमात आहेत.
मात्र असे असतानाही पिकांना तसेच फळबागांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. महावितरणकडून चक्राकारपद्धतीने कधी दिवसा तर कधी रात्री वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकास पाणी देण्यासाठी विजेच्या उपलब्धतेनुसार घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र दिवसा अनेक वेळा वीजपुरवठा खंडीत होतो किंवा कमी दाबाने मिळतो. त्यामुळे शेतकरी रात्रीच पिकास पाणी देण्यासाठी पसंती देतात.
सध्या गाराठा वाढला आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. भोयरे गांगर्डा येथील प्रवीण गायकवाड यांना पळवे व रस्त्यावरील घाटात बिबट्याचे दर्शन झाले. तसेच बाबुर्डी येथील शेतकऱ्याला पाणी सोडताना बिबट्याचे दर्शन झाले.
तालुक्यातील रुईछत्रपती, भोयरे गांगर्डा बाबुर्डी, वाघुुंडे, आपधूप, कडूस, पाडळी रांजणगाव, वाळवणे, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, घाणेगाव, जातेगाव, पळवे, म्हसणे, शहांजापूर आदी गावांच्या परिसरात सध्या शेतकऱ्यांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत तयार झाली आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा विजपुरवठा करावा अशी मागणी अता शेतकऱ्यांमधून होत आहे. कधी कधी दिवसा वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र तो कमी दाबाने होतो. त्यामुळे मंत्री साहेब, दिवसा नाही, तर निदान रात्री तरी शेतीपंपांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.