मंत्री बाळासाहेब थोरातांची वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा, काॅंग्रेसचे 53 आमदारही देणार महिण्याचा पगार

मुंबई, दि. 29- करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपले वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तर कॉंग्रेसचे 53 आमदार त्यांचा महिन्याभराचा पगार देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.

करोना संकट आणि राज्यात घेण्यात आलेल्या सरसकट मोफत लसीकरणाच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. सरसकट मोफत लसीकरणासाठी कॉंग्रेस आग्रही होती. अशातच लसीकरणादरम्यानचा राज्यावरचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी कॉंग्रेसच्या वतीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाळासाहेब थोरात यासंदर्भात बोलताना म्हणाले की, एक वर्षाचे मानधन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे विधिमंडळ कॉंग्रेसचे म्हणजे, विधानसभा आणि विधान परिषदेचे 53 आमदार त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत. तसेच महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने 5 लाखांचा निधीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत.

तसेच व्यक्तिगत मदतीबाबत बोलायचे झाले तर अमृत उद्योग समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी सर्व एकत्रित करून जवळपास 5 हजारांचा सेवक वर्ग आहे. त्यांच्यासाठीचा खर्चही आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत. राज्याच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात हलका करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सर्वांनीच असा पुढाकार घ्यावा, असे आमचे आवाहन आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.