7,902 जणांना मिळणार प्रतिदिन 796 रुपये वेतन
पुणे – महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना आता समान वेतन दिले जाणार आहे. त्यानुसार, प्रत्येकाला आता प्रतिदिन 796 रुपये वेतन देण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा पालिकेच्या सुमारे 7 हजार 902 कंत्राटी कामगारांना होणार आहे.
महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात कामासाठी कुशल, अर्ध कुशल तसेच अकुशल कामगार नेमले जातात. महानगरपालिकेमध्ये कुशल-1,454, अर्धकुशल-734 व अकुशल-5,714 असे एकूण 7 हजार 902 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. सद्यःस्थितीत त्यात सफाई कर्मचाऱ्यांना 687 रुपये प्रतिदिन, पाणीपुरवठा, मोटार वाहन विभाग व विद्युत विभाग कामगारांना 562 रुपये प्रतिदिन तर आरोग्य, सुरक्षा विभागाकडील सेवकांना 582 रुपये हे प्रतिदिन वेतन देण्यात येत आहे.
राज्यशासनाच्या 24 फेब्रुवारी 2015 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार अंमलबजावणी करणेकामी सर्व कंत्राटी कामगारांचे किमान वेतन दर सुधारित करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत महापालिकेस या कामगारांना किमान वेतन देण्यासाठी 185 कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे आता स्थायी समितीने या निर्णयास मान्यता दिल्याने या कर्मचारी वेतनासाठी 202 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी देण्यासही समितीने मान्यता दिली आहे.