टप्पा क्रमांक दोन मधील स्थिती
महसूल, एमआयडीसी प्रशासनाची बघ्याची भूमिका
शिंदे वासुली -चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्र. दोन मधील शिंदे, वासुली परिसरात राजरोसपणे अनधिकृतरित्या उत्खनन सुरू असल्याने मुरूम चोट्यांचा सुळसुळाट झाला आहे. याप्रकरणी महसूल विभाग व एमआयडीसी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून त्यांच्याच कृपेने हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा आहे.
एमआयडीसी परिसरात अनेक कंपन्या नव्याने येत आहेत. यावेळी प्लॉट डेव्हलपमेंट करताना महसूल नियम व कायद्याचे पालन न करता औद्योगिक परिसरात बेकायदेशीरपणे जमीन उत्खनन करीत आहे. सपाटीकरण व लेव्हलिंगच्या नावाखाली संबंधित ठेकेदार जमिनीतील मुरूम बेमालूमपणे गायब करतात. आणि पुन्हा पायाभरणीसाठी अन्य ठिकाणांहून मुरूम आणला जातो. मग काढलेला मुरूम कुठे जातो ? व पायाभरणीसाठी दुसरा मुरूम कुठून आणला जातो? हे एक न उलगडणारे कोडेच आहे.
औद्योगिक परिसरात अनेक ठिकाणी काही ठेकेदार व लॅंड डेव्हल्पर व्यावसायिकांनी एमआयडीसीच्या मोकळ्या प्लॉटमधून इतका मुरूम उपसा केला आहे की ठिकठिकाणी सुमारे 10-10 फूट खोलीचे खड्डे पडलेले आहेत. परिसरात रात्री-अपरात्री जमिनींचे उत्खनन सुरू असते. मुरूम वाहतूक करणारे डंपर, हायवा गाड्या बिनदिक्कत भरवस्तीतून व रहदारीच्या रस्त्यावर सुसाट धावत असतात, काहीवेळा गाड्यांमधून रस्त्यावर मुरुमाचा खच पडलेला असतो. यामुळे नागरी वाहतुकीला व नागरिकांना प्रवास करणे अडचणीचे ठरते. दरम्यान, काही व्यावसायिक व कंपन्यांनी रितसर परवानगी घेऊन मुरूम उचलत असल्याचे अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे; परंतु रितसर परवानगी घेणाऱ्यांपेक्षा अनधिकृत उत्खनन करणारी संख्या अधिक आहे. हे सगळे प्रकार महसूल व एमआयडीसी प्रशासनाच्या कृपा असल्याशिवाय होऊ शकत नसल्याची चर्चा जनमानसात आहे. महसूल अधिकारी परिसरातील मुरूम चोरी घटनांना आळा घालून संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
औद्योगिक परिसरात अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असून तशा प्रकारच्या सूचना संबंधित गावकामगार तलाठ्यांना देणार आहे.
– बाबा साळुंके, मंडलाधिकारी, चाकण
औद्योगिक परिसरात अवैधरित्या उत्खनन करुन मुरुम चोरी च्या घटनांबद्दल आम्हाला माहिती नाही. शिवाय या प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही. याबाबत एमआयडीसीच्या वतीने महसूल प्रशासनाला कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. तो त्यांचा अधिकार आहे.
– प्रकाश भडांगे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, पुणे
अधिकाऱ्यांचे कानावर, डोळ्यावर हात
औद्योगिक परिसरात सर्रास मुरूम चोरी होत असताना महसूल व एमआयडीसी प्रशासन कानावर व डोळ्यांवर हात ठेवून बसल्याचे दिसून येते. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे; परंतु कोणीही अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत.
पत्रकार म्हणतात की….
मुरूम चोरीच्या घटनांमध्ये महसुली अधिकाऱ्यांनी कोणी रितसर परवानगी घेतली आहे अथवा नाही. कोणी सरकारी नियमाप्रमाणे रॉयल्टी भरली किंवा नाही. याची खात्रीपूर्वक तपास करुनच कारवाई करण्याची गरज आहे. आमच्याकडेच पुरावे मागून आम्हाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करु नये, अशी पत्रकारांची भूमिका आहे.