नांदेड – राज्यात करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. नांदेड जिल्ह्यातही करोना रुग्णवाढीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंदीर, मस्जीद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बौद्धविहार व इतर धार्मिक व प्रार्थना स्थळे दि. 18 मार्च पासून 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत.
या धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी केवळ धार्मिक व प्रार्थना स्थळाशी संबंधित धर्मगुरू हे त्या ठिकाणी नित्य नियमाप्रमाणे धार्मिक विधी करतील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भाविक, बाहेरील व्यक्तीस असी धार्मिक स्थळी प्रवेशास 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
तसेच 18 मार्च ते 31 मार्च या कालावधीत जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच करोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे पालन करून चालू राहतील. सदर निर्बंध औषधी दुकानांसाठी लागू राहणार नाहीत.
दरम्यान, 16 मार्च रोजी जिल्ह्यात 597 करोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 15 मार्चला 414 करोनाबाधित आढळले होते. दररोज नवीन करोनाबाधितांची संख्या वाढतच जात असल्याने हे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.