प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर
इंग्लंडची राजधानी लंडन येथील ब्लेचली पार्कमध्ये अलीकडेच एआयमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि नव्या संधींसंदर्भात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
एआयचा भस्मासूर कोणते नवे प्रश्न निर्माण करणार? त्यामुळे जगात बेकारीची लाट येईल का? मानवी जीवन त्यामुळे अधिक संकटग्रस्त होईल का, असे अनेक प्रश्न सध्या जागतिक पटलावर उद्भवले आहेत. या दोन दिवसांच्या शिखर परिषदेनंतर प्रकाशित करण्यात आलेल्या घोषणापत्रात समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी मानवकेंद्री उपाययोजना करण्याचा सुखद धक्का देण्यात आला आहे.
या परिषदेच्या विचारमंथनातून जे रत्न निघाले त्याचे स्पष्टीकरण इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अंतिम निवेदनात केले. जगामध्ये नोकऱ्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल लोकांनी काळजी करू नये. कारण, शैक्षणिक सुधारणांमुळे कौशल्य वाढेल, उत्पादकता वाढेल असा आशावाद त्यांनी प्रकट केला. पहिल्या एआय सुरक्षा परिषदेचे सार सांगताना सुनक यांनी असे सुतोवाच केले आहे की, एआय तंत्रज्ञानामुळे दीर्घकालीन विचार करता जगातील अर्थव्यवस्था निश्चितपणे सुधारू शकतील. एआयची नवीन साधने ही नोकऱ्यांची क्षेत्रे बदलण्याऐवजी लोकांना प्रगत तांत्रिक कौशल्ये मिळविण्यासाठी मदत करतील.
जगातील संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील एक नवा पायलट किंवा नवा दमदार चालक म्हणून एआयकडे पाहिले पाहिजे. एआय तंत्रज्ञानाबद्दल बागुलबुवा न करता या क्षेत्रात मनुष्यबळ विकास कार्यावर भर दिला पाहिजे. प्रगत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एआयला कसे सामोरे जावयाचे, कृषी-औद्योगिक-शिक्षण क्षेत्रात कोणत्या सुधारणा करावयाच्या हे त्या- त्या देशांच्या सरकारचे प्राधान्य काम असले पाहिजे, असे सुनक यांचे म्हणणे आहे. एआय तंत्रज्ञानाची साधने कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे वापरली जातील यावर त्याचे यश अवलंबून आहे. याच्या अतिप्रभावामुळे काय होईल, याची चिंता वाटत असली तरी कालांतराने उत्पादकता वाढविणे शक्य होणार आहे. कोणतेही नवीन तंत्रज्ञान मग ते संगणक असो, इंटरनेट असो, त्यांच्या आगमनाच्या वेळी जी भीती होती, ती भीती आज राहिलेली नाही; उलट त्यामुळे लोकजीवन व अर्थव्यवहार अधिकाधिक सुकर, गतिमान आणि पारदर्शी बनले आहे. त्यामुळे एआयच्या बागुलबुवाकडे अतिशयोक्ती म्हणून पाहिले पाहिजे, असा या बैठकीचा सूर होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता एक साधन आहे, साध्य नव्हे. त्या साधनाची शुचिता व पावित्र्य वापरणाऱ्याच्या नैतिकतेवर अवलंबून असेल. एआय हे साधन कोणालाही त्याची कामे चांगल्याप्रकारे जलद गतीने करण्यासाठी मदत करू शकते. पण त्याची कार्यपद्धती निर्दोष, स्वच्छ आणि चांगल्या हेतूवर आधारलेली असली पाहिजे. त्या त्या देशातील सरकारची ही जबाबदारी आहे की, तेथील शिक्षणव्यवस्था जागतिक दर्जाची असली पाहिजे. सुनक आणि उद्योग प्रतिनिधी ऍलन मस्क यांनी भविष्यात सामायिक प्रयत्नातून चांगल्या नोकऱ्या देण्याचे अधिवचन दिले आहे. याचा अर्थ असा की, एआयचे संकट नव्या रोजगार निर्मितीसाठी वरदान ठरू शकेल. कारण, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उच्च वेगाने प्रसारित होत आहे. त्यामध्ये आधुनिक जीवनातील अनेक पैलू बदलण्याचे सामर्थ्य आहे. त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी हे तंत्रज्ञान जबाबदारीने, सुरक्षितपणे कसे वापरता येईल याबाबत जागतिक नेत्यांनी विचारविनिमय केला. ऍलन मस्क यांच्यासारख्या श्रेष्ठ टेकबॉस म्हणजे तंत्रज्ञानातील अग्रणींसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत या नव्या मुद्द्याबाबत चिंतन करून निर्णय घेण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकांना एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीप्रमाणे समस्या सोडविण्याची आणि शिकविण्याची अनुमती आणि ज्ञान देते. कला, साहित्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत एआय सिस्टीमचा वापर केला जात आहे. एआयचा धोका टाळण्यासाठी अमेरिकन चित्रवाणी कलावंतांनी मध्यंतरी मोठा संप केला. त्यामुळे एआयचा वापर कुठे व किती थांबवावयाचा याबाबत मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मानवासारखे संभाषण करणे, ऑनलाइन खरेदीला साहाय्य करणे, उत्पादन व सेवा सुधारण्यास मदत करणे, यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा उपयोग होतो. हे तंत्रज्ञान ऍलेक्साच्या मदतीप्रमाणे उपयोगी पडते. तसेच मेटा, एक्स या समाज माध्यमांतसुद्धा वापरकर्त्यांना, पोस्ट करताना गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत करू शकते. भविष्यात ग्राहकांना खरेदी करण्यासाठी उत्पादनांचे विश्लेषण करून मार्गदर्शन करू शकते. बनावट व खोट्या उत्पादकांवर कारवाई करण्यासाठीसुद्धा हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकते.
बिल गेटस् यांच्या मते, एआय ही दशकातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी गरूडझेप आहे. एआय बरोबरच चॅट जीपीटी, जनरेटिव्ह एआय यांसारखे तंत्रज्ञान वेगाने पुढे येत आहे. त्यातील अनेक नव्या जनरेटिव्ह पिढ्या एआयमध्ये झपाझप नवी पावले टाकत आहेत. ऑनलाइन मजकूर आणि प्रतिमा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध डेटामधून नवीन सामग्री तयार करण्यासाठी एआय तंत्राचा उपयोग होतो. तथाकथित चॅट बॉटस् संभाषणे तयार करताहेत. एआय प्रोग्रॉम साध्या मजकुरातून नव्या प्रतिमा तयार करू शकतात. तसेच एआय जनरेटिव्ह एखाद्या प्रसिद्ध संगीतकाराच्या शैलीमध्ये व्हिडिओसुद्धा बनवू शकतात. काही वेळा हे प्रोग्रॉम चुकीच्या प्रतिमा तयार करण्याचा धोका असतो. अनेकवेळा कलाकार, लेखक यांनी इशारा दिला आहे की, एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कलाकारांना त्यांच्या कामाचा मोबदला न देता शोषण आणि अनुकरण करण्याचा धोका संभवतो. शाळेच्या कामात एआयचा वापर करावा काय, चॅट जीपीटी तंत्र वापरून सगळी परीक्षा उत्तीर्ण करता येईल का, असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. एआयमुळे अनेक धोकादायक संकटे उद्भवू शकतात, अशी भीती व्यक्त केली जाते. त्यातील हे सर्व धोके लक्षात घेता एआय संशोधन थांबवावे किंवा त्यावर बंधने घालावीत असे म्हटले जाते.
इंग्लंडमधील सरकारच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, एआय तंत्रज्ञान हॅकर्सनी वापरल्यास नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात. अतिबुद्धिमान व्यक्तीच्या क्षमतांना हे कृत्रिम आव्हान आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर एआय सेफ्टी या संस्थेने या तंत्राच्या धोक्याबाबत इशारा दिला होता. एआयचे पितामह म्हणून ओळखले जाणारे जेप्री हिंटन आणि एशिओ बेलजीवो यांनीही काही संकटांचा धोका नोंदविला. यावर यान लेखून यांनी एआय जगातील बुद्धिमत्तेचा ताबा घेत आहे ही कल्पना निराधार आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले.
लंडनपासून 55 किलोमीटर अंतरावर असणारी ब्लेचली पार्क ही एक ऐतिहासिक इमारत आहे. याच इमारतीमध्ये हिटलरची गुपिते ट्युरिन या ब्रिटिश गणितज्ज्ञाने उकलली होती. त्याच्याकडे पुढे संगणक शोधाचे श्रेय दिले गेले. यावरून पंतप्रधान ऋषी सुनक यांना असे सूचित करावयाचे आहे की जगात संगणकाचा पाया इंग्लंडने घातला आणि आज 3.5 दशलक्ष पौंड एवढा मोठा एआय उद्योग इंग्लंडमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे जगाला दिशा देण्याचे काम इंग्लंडला करावयाचे आहे. म्हणून त्यांनी पुन्हा जगाचे नेतृत्व करण्यासाठी ही शिखर परिषद एक निमित्त मानली आहे. पुढील शिखर परिषदा दक्षिण कोरिया व फ्रान्समध्ये होणार आहेत. 10 देशांनी लंडन जाहीरनाम्यावर सह्या केल्या पण त्यात चीनचा समावेश नव्हता. जागतिक समुदायात 193 देश असल्यामुळे ही संख्या अत्यल्प असली तरी या बैठकीने उद्याच्या भविष्यातील नव्या प्रश्नांचा, आव्हानांचा वेध घेण्याची सकारात्मक सुरुवात झाली आहे, हे निश्चित.