एक पोलीस अधिकाऱ्याचाही सहभाग
इम्तियाज जलील यांच्या आदेशावरून घोळ झाल्याचा अंजुम इनामदार यांचा आरोप
पुणे – विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना तिकीट वाटपात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशावरून पैसे घेतले आहेत. या व्यवहारात एक पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे माजी सदस्य अंजुम इनामदार यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
इनामदार म्हणाले, खासदार जलील यांनी तिकीट वाटपात आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणात औरंगाबाद येथून ए. बी. फॉर्म घेऊन आलेले जळगाव जिल्हाध्यक्ष जिया बागवान, एमआयएमचे कराडचे उमेदवार अल्ताफ शिकलगार, त्यांचे चिरंजीव शाहरुख व एका अधिकाऱ्याने केलेले संभाषण उपलब्ध आहे. याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस महासंचालकांना पत्र पाठविण्यात आले आहे. तिकीट वाटपात कराड, मुंबई, परभणी व काही मतदारसंघांत जलील यांच्या आदेशावरून पैसे घेण्यात आले आहेत. या प्रकरणात पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यभरात पक्षाची बांधणी झाल्याने विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या जास्त झाली होती. त्यामुळे, एखाद्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली नसल्याने पक्षाची बदनामी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम