हैदराबाद – ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण योगी आदित्यनाथ यांच्या रोड-शोमुळे आणखी तापले आहे. रोड-शो दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना योगी यांनी, “काही लोक मला विचारत होते हैदराबादचे नामकरण भाग्यनगर होऊ शकते का? मी त्यांना सांगितलं भाजप सत्तेत आल्यानंतर जर फरिझाबाद अयोध्या आणि अलाहाबाद प्रयागराज होऊ शकते तर हैदराबाद भाग्यनगर का होऊ शकत नाही?” असं म्हणत भाजपने येथे आपली सगळी ताकद पणाला लावल्याचेच दर्शवले. त्यांचा या टीकेवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
हैदराबादचे नामकरण भाग्यनगर होऊ शकते का? मुख्यमंत्री योगी म्हणाले…
ओवेसींनी म्हणाले की, ‘हैदराबादचं नाव बदलणं हेच भाजपचं लक्ष्य आहे. पण तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैदराबादचं नाव बदलणार नाही.’ अशी खोचक टीका ओवेसींनी केली आहे.
तत्पूर्वीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमवर जोरदार निशाणा देखील साधला होता. “बिहारमध्ये, एमआयएमच्या एका नवनिर्वाचित आमदाराने शपथविधीवेळी ‘हिंदुस्थान’ या शब्दाचा उच्चार करण्यास नकार दिला. ते हिंदुस्थानात राहतात मात्र जेव्हा हिंदुस्थानच्या नावाने शपथ घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांची वाचा बंद होते. यावरून एमआयएमचा खरा चेहरा पुढे येतोय.” अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
या निवडणुकीसाठी केंद्रीय पातळीवरील नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भूपेंद्र यादव हे या पालिका निवडणुकीचे पक्षाचे प्रभारी असून जीके रेड्डी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते आधीच हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. यादव यांच्याकडेच बिहार विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.