एकूणच औरंगाबाद शहर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. चंद्रकांत खैरे तब्बल 20 वर्षे औरंगाबादचे खासदार होते. पण, तरीही औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ कधीही शिवसेनेला मिळाला नाही. येथून कॉंग्रेसने नेहमीच विजय मिळवले. मात्र, 2014 च्या निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री झाली आणि मंत्री राजेंद्र दर्डा पराभूत झाले. तेव्हापासून आजपर्यंत या मतदारसंघात कॉंग्रेस ढेपाळलेल्या अवस्थेत आहे.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात एआयएमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे विद्यमान चंद्रकांत खैरे यांच्यावर तब्बल 36 हजार 930 मतांची आघाडी घेतली. जलील यांना मिळालेले हे मताधिक्य पाहता विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात “कमळ’ पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यंदा एमआयएमकडून पुन्हा डॉ. गफार कादरी रिंगणात उतरणार आहेत. शिवसेना-भाजप यंदा युती करून रिंगणात उतरले आहेत. तरीही येथून एमआयएमला विजयाची खात्री अधिक आहे. कारण 2014 च्या निवडणुकीमध्ये हे केवळ मुस्लिमांची मते एमआयएमच्या उमेदवाराला मिळाली होती.
आता लोकसभा मतदार संघातही या मतदारसंघातून दलित समाजाची मते एमआयएमला मिळाली होती आणि तीच मतं विधानसभेतही कायम राहतील, असा विश्वास एमआयएमला आहे. भाजपादेखील मुस्लिम आणि दलित समाजाची मतं कशी फुटतील आणि त्यामुळे आपला कसा फायदा होईल, अशी रणनीती आखत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप विरुद्ध एमआयएम अशीच लढत पाहायला मिळेल हे मात्र निश्चित आहे.
कॉंग्रेसकडून 2014 मध्ये लढलेले राजेंद्र दर्डा हे यंदा इच्छुक नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसला या मतदारसंघातून उमेदवार शोधूनच उभा करावा लागेल.
एमआयएमने 2014 च्या निवडणुकीत डॉ. गफार कादरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. अवघ्या काही मतांनी येथे भाजपचे अतुल सावे विजयी झाले होते. सावे यांना 64 हजार 528 मते मिळाली. एआयएमआयएमचे अब्दुल गफार कादरी यांना 60 हजार 278 मते मिळाली. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार माजी महापौर कला ओझा यांना 11 हजार 409, कॉंग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांना 21 हजार 203 मते मिळाली होती.
या निवडणुकीतील विजयाचे गिफ्ट म्हणून सावे यांना राज्यमंत्री पदही मिळाले आहे. त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत कितपत होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, महापालिकेतही शिवसेना-भाजप यांची युती आहे. त्यामुळे निवडणुकीत युतीधर्म पाळला जातो, का हे देखील येत्या काळात दिसून येणार आहे.