“गिनीज बुक’साठी विद्यापीठाची कोट्यवधींची उधळपट्टी

3 कोटी 40 लाखांची तरतूद : विद्यापीठाकडून खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ

पुणे – विद्यापीठाने मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना रोपे वाटप करून गिनीज बुक रेकॉर्डवर मोहोर उमटवली. मात्र, या कार्यक्रमासाठी विद्यापीठाने तब्बल 3 कोटी 40 लाखांची तरतूद केली होती. त्यापैकी विद्यापीठामार्फत 69 लाख, तर उर्वरित निधी 2 कोटी 71 लाख रुपये विविध प्रायोजकांमार्फत निश्‍चित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एकूण किती खर्च झाला आहे, त्याची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याची माहिती विद्यापीठाकडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे. त्यामुळे निर्मल वारीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी विद्यापीठाकडून सुरू असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

पुणे विद्यापीठाने “स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ या अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना कडुनिंबाची 16 हजार 731 रोपांचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या रेकॉर्डची नोंद घेण्यात आली. हा कार्यक्रम 23 जून रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात उत्साहात झाला; परंतु या कार्यक्रमासाठी तरतूद करण्यात आलेल्या खर्चाची आकडेवारी आश्‍चर्यकारक आहे. विद्यापीठ ही शासकीय यंत्रणेचा भाग असून त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित होते. मात्र, एखाद्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष विद्यापीठाकडून 69 लाख रुपयांचा निधी ही बाब निश्‍चितच अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. विद्यार्थी संघटनेचा कुलदीप आंबेकर यांनी या कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाची तपशील माहिती अधिकारातून मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यास विद्यापीठाने “मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमासाठी खर्चाची देयके अदा करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत माहिती पुरविता येणार येत नाही’ असे उत्तर दिले आहे.

विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती. जी रोपे वाटली गेली, त्यातील बहुतांश रोपे अस्ताव्यस्त पडली होती. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे कोणतेच नियोजन नव्हते. तसेच प्रायोजकांची नावे व खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
– कुलदीप आंबेकर, विद्यार्थी संघटना

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.