राज्यपाल होणार असल्याचे सांगून लाखोंचा गंडा

पिंपरी  – महसूल विभागात आयुक्‍त पदाचा नुकताच राजीनामा दिला असून मला महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल करणार आहेत, अशी बतावणी करून एका तोतयाने फ्लॅट मालकाला तब्बल 4 लाख 8 हजार 495 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 21 जून 2018 ते 25 जून 2019 या कालावधीत गोविंद गार्डन जवळ पिंपळे सौदागर या ठिकाणी घडला.

प्रकाश दिनकर भेंडे (वय 59, रा. थेरगाव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरेश लोहार उर्फ नंदकुमार रंगनाथ कांबळे (रा. अकलूज, जि, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भेंडे याचा पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डनजवळ विदा सोसायटीत फ्लॅट आहे.

21 जून 2018 रोजी आरोपीने आपण महसूल विभागातील नोकरीचा राजीनामा दिला असून मी लवकरच महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल होणार असल्याची बतावणी भेंडे यांच्याकडे करुन विश्‍वास संपादन केला. आमचे काम पुणे व मुंबई या ठिकाणी चालणार असून त्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहण्यासाठी भाड्याने फ्लॅटची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. आपल्या सदनिकेत राज्याचे भावी राज्यपाल राहणार या विश्‍वासाने भेंडे यांनी फ्लॅट दिला. यावेळी, आरोपीने कोणतेही डिपॉझिट व भाडे करारनामा न करता राहण्यास सुरुवात केली. फुकटात राहत असताना आरोपीने लाईट बिल देखील भरले नाही. एवढेच नव्हे तर फ्लॅट मालकाचा फ्लॅटमधील एसी देखील चोरुन नेला. प्रकाश यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.