लंडन – आपल्या स्वतःच्या जन्माच्या वेळी आईला योग्य सल्ला न दिल्याबद्दल एका 20 वर्षीय तरुणीने एका डॉक्टरविरोधात लक्षावधी डॉलरचा खटला जिंकला आहे. एव्ही टुंबेस नावाच्या या तरुणीला जन्मापासूनच मणक्याचा जन्मजात विकार आहे.
यामुळे तिला काहीवेळा दिवसभर रुग्णशय्येवर पडून रहावे लागते. आपल्या या अवस्थेला आई गर्भवती असताना तिला सल्ला देणारे डॉक्टरच जबाबदार आहेत, असा तिचा दावा आहे.
एव्हीची आई गर्भवती असताना त्यांच्यावर डॉ. फिलीप मिचेल उपचार करत होते. आपल्यातील जन्मजात दोष कमी करण्यासाठी डॉ. मिचेल यांनी आपल्या आईला फॉलिक ऍसिड सप्लिमेंट घेण्याचा सल्ला द्यायला हवा होता.
किंवा त्यापेक्षा आपला जन्मच होऊ द्यायला नको होता, अशी भावनाही एव्हीने व्यक्त केली आहे. मात्र वाळाचा जन्म उशीरा होऊ देण्यासंदर्भात आपण एव्हीच्या आईला योग्य सल्ला दिला होता, असे डॉक्टरांचे म्हणणे होते.
लंडन उच्च न्यायालयाने एव्हीचा दावा ग्राह्य धरला आहे. एव्हीच्या आईला जर योग्य सल्ला दिला गेला असता तर एव्हीचा जन्म उशीरा होऊ दिला गेला असता. एव्हीला आता मोठी नुकसान भरपाई मिळू शकणार आहे.
ही नुकसान भरपाई नक्की किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पुढील आयुष्यातील आरोग्याची काळजी घेण्यास पुरेसे पैसे मिळतील, असे एव्हीच्या वकिलांनी म्हटले आहे.