महागणपतीच्या मुक्‍तद्वार दर्शनाला लाखो भाविक

रांजणगाव गणपती – श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपतीच्या मुक्‍तद्वार दर्शनाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला. आज द्वारयात्रेची सांगता झाली.

श्री गणेश चतुर्थीनिमित्त मध्यरात्रीनंतर 1 वाजता महागणपतीला जलाभिषेक करण्यात येऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे, खजिनदार शेखर देव, ग्रामस्थ, कर्मचारी व भाविक उपस्थित होते. वर्षातून एकदाच थेट महागणपतीच्या मूर्तिला स्पर्श करुन म्हणजे मंदिर गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळते. आज श्री गणेश चतुर्थी असल्याने दर्शनासाठी मध्यरात्री 1 वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती. श्रींच्या पालखीचे ऊत्तरद्वार यात्रेकरिता ढोकसांगवी गावाकडे दुपारी 12 वाजता वाजतगाजत मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. आजच्या पालखीचा मान शेळके आळीतील ग्रामस्थांकडे होता.

दरम्यान, महागणपतीचे दुपारी 1 वाजता विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी अनुसया महिला केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, बाळासाहेब भोर, सरपंच सर्जेराव खेडकर यांसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोजकुमार यादव, सहायक निरीक्षक प्रफुल्ल कदम, उपनिरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)