विकल्या न गेलेल्या लॉटरी तिकिटाने बनवले करोडपती!

थिरूवनंतपूरम – लॉटरी तिकिटे विकून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या एका विक्रेत्याला शब्दश: लॉटरी लागली. विकल्या न गेलेल्या लॉटरी तिकिटाने त्याला करोडपती बनवून टाकले.

शराफुद्दीन ए (वय 46 वर्षे) असे नशीबवान लॉटरी विक्रेत्याचे नाव आहे. शराफुद्दीन मूळचा तामीळनाडूचा. मात्र, रोजगारासाठी त्याने सीमेलगतच्या केरळमधील कोल्लम जिल्ह्याची वाट धरली. कुटूंबीयांसमवेत एका छोट्या घरात तो राहतो.

जवळच लॉटरी तिकिटे विकण्याचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वी त्याने विक्रीसाठी केरळ सरकारची नाताळ-नववर्ष बंपर सोडतीची तिकिटे ठेवली. काही तिकिटे विक्रीअभावी त्याच्याकडेच पडून राहिली. त्यातील एका तिकिटाने थोडे-थोडके नव्हे तर 12 कोटी रूपयांचे पहिले बक्षीस जिंकण्याचा मान मिळवला.

आता करकपात आणि इतर प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर शराफुद्दीनच्या हाती 7 कोटी 50 लाख रूपये येतील. शराफुद्दीनचे कुटूंब सहा जणांचे. त्यामध्ये आई, दोन भाऊ, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. आता स्वत:चे घर, कर्जाची परतफेड आणि छोटा व्यवसाय ही स्वप्नं तो सत्यात उतरवू शकणार आहे.

रोजगारासाठी तो तब्बल नऊ वर्षे सौदी अरेबियात राहिला. मात्र, तिथे बस्तान न बसल्याने तो 2013 मध्ये परतला. त्यानंतर उपजीविकेसाठी सुरू केलेल्या लॉटरी तिकीट विक्रीने त्याला मालामाल बनवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.