अमिराती आपल्या पश्चिमेलाच आहे हे चांगले झाले, म्हणजे शिर्षकाचा संदर्भ लागणे सोपे बनले. गेल्या वर्षीपासून आताच्या आयपीएल स्पर्धेपर्यंत भारताचा रनमशिन विराट कोहलीनेही कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. त्यातही अमिरातीत आयपीएल स्पर्धा होणार हे निश्चित झाल्यावरच कोहलीच्या यंदाच्या वर्षीच्या कमाईचा स्रोत (खरे सांगायचे तर धबधबा) सुरू झाला. ही स्पर्धा झाली नसती तर कोहलीला करोडो रुपयांचा फटका बसला असता. या संपूर्ण स्पर्धेत कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला अपयश आले असले तरीही कोहली नफ्यातच आहे.
2019 साल कोहलीसह सर्वांनाच यशदायी ठरले होते. यंदाही त्याला न्यूझीलंडमधील मालिकेने बोहनी चांगली झाली होती. मात्र, करोनाचा धोका सुरू झाला आणि अब्जाधीश कोहलीला करोडोंचा फटका बसला. त्यातून देशात लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्वच खेळ ठप्प झाले. या स्थितीत स्पर्धा कधी सुरू होणार, सामने कधी खेळवले जाणार आणि खेळाडूंना कमाई कधी होणार या व अशा प्रश्नांनी अनेकांची झोप उडाली. खेळाडूची कारकीर्द एखादा सचिन तेंडुलकर वगळता किमान 7 ते 8 वर्षे असते. काहींची 10 ते 15-17 वर्षेही होते. मग अशा स्थितीत एखाद्या मोसमात अपयश आले तर कमाईवरही फरक पडतो. करोनाने संपूर्ण जग जवळपास सहा महिने थांबले होते. अशा स्थितीत भारतीय क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर कोहलीसह बोटावर मोजता येतील अशा खेळाडूंची घरबसल्या कमाई सुरू होती.
गेल्या वर्षी जवळपास 182 कोटी रुपयांची कमाई केलेला कोहली करोना काळात घरात बसूनही फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच ट्विटरवर रोज एक पोस्ट करत करोडो रुपयांची कमाई करत होता हे अनेकांच्या गावीही नव्हते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासून घरात बसलेल्या कोहलीने अमिरातीतील आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी पश्चिमेकडे झेप घेतली व त्याच्या कमाईच्या आकड्यांनीही कोटीच्या कोटी उड्डाणे केली. यंदाच्या वर्षातील जवळपास दीड महिने बाकी असूनही कोहलीने 192 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगातील शंभर श्रीमंत खेळाडूंच्या यादीत कोहलीचा 66 वा क्रमांक आहे. यंदा त्याने या क्रमवारीत 30 वे स्थान मिळवले आहे. त्याला भारतीय संघाकडून किंवा आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून खेळताना जो पैसा मिळतो तो जस्ट आयसिंग ऑन केक किंवा पिनट्स ठरतो.
कोहलीला भारतीय संघाकडून खेळताना अ श्रेणीतील खेळाडूचे मानधन म्हणून जवळपास 8 कोटी रुपये मिळतात. बाकी उरलेली प्रचंड रक्कम त्याला जाहिराती व ब्रॅण्डशी झालेल्या करारांतून मिळते. म्हणजे कोहलीची एका सेकंदाची कमाई इतकी आहे की त्याच्या खिशातून 100 रुपयांची नोट खाली पडली तर ती उचलण्यात त्याला जेवढा वेळ लागेल त्या वेळेत त्याने लाखो रुपयांची कमाई केलेली असते. सध्या कोहलीकडे जगभरातील सर्वात टॉप ब्रॅण्डचे करार आहेत. त्यात ऑडी, हिरो, एमआरएफ, प्युमा, व्हॅल्व्होलिन या अग्रेसर ब्रॅण्डचा समावेश आहे. कोहली आज केवळ 32 वर्षांचा आहे. त्याचा फिटनेस, फॉर्म पाहता तो आणखी किमान 5 ते 7 वर्षे निश्चितच खेळेल.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जेव्हा करोडोंचे करार केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आज कोहलीची उड्डाणे पाहिली की भोवळ येते. त्याने कामगिरी देखील अशी केली आहे की त्याच्याशी करार करण्यासाठी नवनवे ब्रॅण्ड पैशांचे गाठोडे घेऊन त्याच्याकडे येतात, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याने भारतीय संघाकडून आजवर 86 कसोटी सामने खेळताना 7 हजार 240, एकदिवसीय 248 सामने खेळताना 11 हजार 867 व 81 टी-20 सामने खेळताना 2 हजार 794 धावा केल्या आहेत. कसोटीत 27 तर एकदिवसीय सामन्यांत 43 शतके त्याच्या नावावर असून सचिनच्या नावावर असलेले जवळपास सर्व विक्रम त्याच्या कक्षेत येत आहेत. अर्थात तो दुसरा सचिन निर्माण होणार नाही हे मान्य पण त्याचा खरा वारसदार मात्र, निश्चितच आहे.