गुढीपाडव्यानिमित्त शहरात कोट्यवधींची उलाढाल

गजबजली बाजारपेठ : इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि वाहनांची खरेदी, नवीन व्यवसायांनाही सुरुवात

-आरटीओ कार्यालयात सुट्टीच्या दिवशीही कामकाज

-पाचशे वाहनांची नोंद : विविध वस्तूंवर सवलत

पिंपरी – नववर्ष व गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत नागरिकांनी नवीन वस्तूची खरेदी करुन गुढीपाडवा साजरा केला आहे. त्यात, दुचाकी वाहन, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, व इतर चैनीच्या वस्तू खरेदी करुन नववर्षाचे स्वागत केले आहे. तर, दुसरीकडे शहरातील विविध सराफा पेढीमध्येही मोठया प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदीस गर्दी दिसून आली. त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.

गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी नवीन वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असतो, या निमित्ताने नागरिकांनी वाहन खरेदी केली आहे. दुपारनंतर वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरुममध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. त्याचप्रमाणे त्यामुळे शुक्रवार व शनिवारी (दि.6) सर्वाधिक वाहनांची विक्री झाली आहे. आरटीओच्या नोंदणीनुसार शनिवारी सुमारे पाचशे वाहनांची नोंद झाली आहे. तर, सहा मोटारीला क्रमांक पडले.

गुढीपाडव्या निमित्त खास नागरिकांच्या सोयीसाठी “आरटीओ’ कार्यालय पहिल्या शनिवारची सुट्टी असताना देखील दिवसभर खुले होते. काही जणांनी या शुभ मुहूर्तांवर वाहन खरेदी केली असून, सोमवारी त्या वाहनांची नोंदणी होईल. त्याचप्रमाणे बाजारपेठेत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीच्या दरात व भेटवस्तू दुकानात ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी मोबाईल फोनसह विविध इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदी केली. उन्हाळयाचा पार्श्‍वभूमीवर फ्रीज, एसी, कूलर, फॅन खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल दिसून येत होता. अनेकांनी त्या वस्तू ऑनलाईन देखील मागवल्या.

शनिवार आणि रविवार सुटी असल्याने अनेकांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. तर, काही नागरिकांनी पर्यटन स्थळांना भेटी देण्याकडे कल दिसला. त्याचप्रमाणे गुढीपाडव्यासाठी तरुणाईने पारंपारिक वस्त्रांना प्राधान्य दिले. शहरातील सर्व कपड्यांच्या दुकानांचे डिस्पले हे पारंपारिक वस्त्रांनी सजले होते. तसेच मोठ्या प्रमाणात रेडीमेड नऊ वारी साड्यांचीही विक्री झाली.

गृहप्रवेश व उद्‌घाटन

साढे तीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवशी सुरू केलेल्या नवीन कामात भरभराट होते अशी मान्यता असल्याने कित्येक नवीन व्यवसायांना आज सुरुवात झाली. विशेषतः उपनगरांमध्ये कित्येक लहान-मोठ्या दुकान, रेस्टॉरेंट व इतर व्यवसायांचे देखील गुढी पाडव्यानिमित्त उद्‌घाटन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन वास्तू बुकींग तर काहींनी या शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केला आहे. तर, गेल्या काही महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या बांधकामांना भेटी देत घरांची निवड केली आणि बुकींगची रक्‍कम देऊन घर खरेदी पक्‍की केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.