पुणे: सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात मिलेनियम संघाने बीव्हीबी संघाला तर 17 वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबई बॉईज संघाने बारामती स्पोर्टस अकादमी संघाला पराभूत करत विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, आयकर उपायुक्त संजीव वर्मा, पुणे आयकर अधिकारी नरेंद्र हसबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जीएसटीचे उपायुक्त प्रदीप रणपिसे, जीएसटीचे सहायक आयुक्त अविनाश चव्हाण, आयडिया-व्होडाफोनच्या सरव्यवस्थापक मोहना मांजरे, निवृत्त अतिरिक्त आयुक्त किशोरी भदे-गद्रे, माजी नगरसेवक राजेंद्र वागस्कर, साईनाथ बाबर, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
17 वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अंतिम लढतीमध्ये मिलेनियम संघाने बीव्हीबी संघाला 25-10, 25-15 असे पराभूत करताना विजेतेपदावर मोहोर लावली. मिलेनियमकडून आदिती जोशी, पूर्वा राठी, तानिया गोळे यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये सिम्बायोसिस संघाने राघवदास हायस्कूल संघाला 19-25, 25-8, 15-7 असे पराभूत केले.
17 वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम फेरीत मुंबई बॉईज संघाने बारामती स्पोर्टस अकादमी संघाला 25-22, 19-25, 15-12 असे पराभूत करताना स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. विजयी संघाकडून सोहम मोरे, तन्मय घुगे, शैलेश यादव यांनी सरस खेळ केला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशन संघाने सिम्बायोसिस यांना 25-17, 25-13 असे पराभूत केले.