सहस्रक पिढीचे गुंतवणूक धोरण (भाग-1)

1981 ते 1996 या कालावधीत म्हणजेच मागील सहस्रकाच्या शेवटच्या कालावधीत जन्मलेल्यांना सहस्रक पिढी असे संबोधले जाते. आता या पिढीतील व्यक्तींचे वय 23 ते 38 च्या दरम्यान आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालानुसार हीच पिढी आता भारतीय अर्थकारणाची यशोगाथा रचण्यात मोलाची ठरत आहे. या वयोगटातील व्यक्तींचा भारताच्या एकूण कार्यशक्तीमधील वाटा 46 टक्के आहे आणि देशातील घरगुती (कौटुंबिक) उत्पन्नामध्ये त्यांचा वाट तब्बल 70 टक्के एवढा आहे. यातून एकूण राष्ट्रीय अर्थकारणाच्या वाढीत त्यांचा किती मोठा वाटा आहे हे लक्षात येते.

असे असले तरी विश्लेषकांना यातील काळी बाजूही दिसते. ही पिढी अनेकदा प्राप्तीपेक्षा कितीतरी जास्त खर्च करते आणि मग महिनाअखेरीस त्यांचे सगळे बजेट कोलमडलेले असते. त्यामुळे सहस्रक पिढीतील अशा नोकरदार आणि व्यावसायिकांचे पर्सनल फायनान्स आणि मनी मॅनेजमेंटबाबत प्रबोधन केले पाहिजे असे विश्लेषकांना वाटते. कारण बचत आणि गुंतवणूक ही त्यांच्यासाठी सगळ्यात शेवटची गोष्ट आणि ती देखील जमली तर अशी स्थिती आहे. त्याचवेळी गुंतवणुकीचे महत्त्व समजलेला आणि त्यासाठी आर्थिक नियोजन करणारा एक वर्ग या सहस्रक पिढीमध्ये आहे. स्वतंत्रपणे अर्थविषयक निर्णय घेऊन स्वतःला आर्थिकदृषट्या बळकट बनवणे हे त्यांचे ध्येय असते. त्यामुळे ही पिढी अर्थनियोजन आणि आर्थिक उद्दीष्टे याबाबत उदासिन असते असे म्हणता येणार नाही. घर खरेदी ही त्यांची सर्वात मोठी आकांक्षा असते. त्यादृष्टीने  संपत्ती निर्मिती हे त्यांचे सर्वात मोठे उद्दीष्ट असते. त्यानंतर आरोग्य, नाती, वैयक्तिक प्रगती आणि प्रतिमा अशा गोष्टींना त्यांच्याकडून महत्त्व दिले जाते. सहस्रक पिढीतील अनेकजण शेअर बाजार, म्युच्युअल फंड याठिकाणी गुंतवणूक करताना दिसतात. असे असले तरी या सगळ्यापासून अद्यापही दूर असलेल्या वर्गासाठी काही टिप्स –

सहस्रक पिढीचे गुंतवणूक धोरण (भाग-2)

हाती असलेल्या पैशातच जगायला शिका –

तुमचा पगार किती आहे यापेक्षा मिळणाऱ्या पगारात तुम्ही कसे भागवता हे महत्त्वाचे असते. तुमचा पगार वीस हजार रूपये असो किंवा पाच लाख रुपये. त्या पैशाच्या गुंतवणुकीचे आणि खर्चाचे नियोजन तुम्ही कसे करता आणि ते नियोजन किती शिस्तीत प्रत्यक्षात आणता हे महत्त्वाचे ठरते. क्रेडिट कार्ड हे फक्त तातडीच्या खर्चासाठीच वापरायचे असते. नोकरीतील अनपेक्षित खंड आणि अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाखेरीज अऩ्य कुठलाही प्रसंग तातडीचा नसतो. आता नोकरीत अचानक खंड पडू शकतो हे गृहित धरून किमान सहा महिन्यांचा खर्च भागेल एवढा तातडीचा फंड तयार करून ठेवला जातो. मुलांचा शाळा-महाविद्यालयीन प्रवेश, गाडी खरेदी, सहल या सगळ्या गोष्टी आधी पैशाची व्यवस्था करूनच केल्या पाहिजेत. अनावश्यक कर्जापासून लांब रहा आणि कमावलेला प्रत्येक पैसा जबाबदारीने खर्च करा.

– चतुर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)