विविधा: मिल्खा सिंग

माधव विद्वांस

“फ्लाइंग शीख’ या टोपण नावाने ओळखले जाणारे धावपटू मिल्खा सिंग यांचे आज अभिष्टचिंतन. त्यांचा जन्म पाकिस्तानातील मुझफ्फरगड जिल्ह्यातील गोविंदगड येथे झाला. त्यांच्या जन्म तारखेबद्दल निश्‍चित माहिती उपलब्ध नाही. फाळणीच्या गोंधळात ते फक्‍त वस्त्रानिशी भारतात आले. ते त्यावेळी 13-14 वर्षांचे असावेत. त्यांना 15 भावंडे होती त्यापैकी 8 भावंडे व आई वडील फाळणीच्या वेळी मारले गेले. ते अनाथ होऊन विस्थापित झाले, ते लग्न झालेल्या बहिणीबरोबर भारतात दिल्ली येथे आले. पुराना किल्ला विभागातील निर्वासित छावणीत ते राहिले. दरम्यान, ते रेल्वेने बिनतिकिटाने प्रवास केल्यामुळे पकडले गेले, त्यांच्या बहिणीने त्यांना दागिने गहाण टाकून सोडविले.

ते सैन्यात भरती झाले. नवीन भरतीसाठी आवश्‍यक असलेल्या क्रॉस-कंट्रीमध्ये सहावे स्थान मिळवल्यानंतर लष्कराने ऍथलेटिक्‍सच्या विशेष प्रशिक्षणात त्यांची निवड केली. पतियाळा येथे 1956 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी लक्षवेधक कामगिरी केली. 1956 मधील मेलबर्न ऑलिम्पिकमधील 200 मीटर आणि 400 मीटर स्पर्धांमध्ये त्यांनी भारतातर्फे भाग घेतला पण त्यावेळी यश आले नाही. वर्ष 1958 मधे त्यांनी कटक येथे आयोजित राष्ट्रीय खेळामधे 200 मीटर आणि 400 मीटर प्रकारात विक्रम नोंदवले आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकेही जिंकली. 1958 मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत 200 व 400 मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला. त्यानंतर “1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 46.6 सेकंदाच्या वेळेसह त्यांनी 400 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे स्वतंत्र भारताकडून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी पहिले सुवर्णपदक जिंकले.

6 सप्टेंबर 1960 ला ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 400 मीटर शर्यतीत आपलाच पहिला विक्रम मोडला. पण त्यावेळी ते चौथे आले व 0.1 सेकंदाने त्यांचे कास्यपदक हुकले होते. पं. नेहरूंनी 1960 मध्ये पाकिस्तानमध्ये मिल्खा सिंग यांना फाळणीच्या आठवणी विसरून खेळण्यास प्रवृत्त केले.

1958च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळालेल्या यशांमुळे मिल्खा सिंग यांना शिपाई पदावरून कमिशन्ड ऑफिसर म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर ते पंजाब शिक्षण मंत्रालयातील क्रीडा संचालक झाले. त्या पदावरून 1998 मध्ये निवृत्त झाले. 1958 मध्ये मिळालेल्या यशानंतर सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1955 मध्ये सिलोन येथे भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल कौर यांच्याशी त्यांची ओळख झाली. वर्ष 1962 मध्ये दोघांनी विवाह केला.

त्यांना तीन मुली आणि एक मुलगा, (गोल्फपटू जीव मिल्खा) आहे. मिल्खा सिंग आणि त्यांची मुलगी सोनिया सांवलका यांनी “द रेस ऑफ माय लाइफ’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र सहलेखन केले आहे. मिल्खा सिंग यांनी धावलेल्या 80 शर्यतींपैकी 77 शर्यती जिंकल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here