नवी दिल्ली -भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी वयाच्या 91 व्या वर्षी करोनामुळे निधन झाले. त्यांच्या पत्नी निर्मला कौर यांचेही 5 दिवसांपूर्वीच करोनामुळे निधन झाले होते. मिल्खा यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, त्यावेळी या महान धावपटूने आपल्या उत्कट प्रेमाची साक्षही उपस्थितांना दिली.
अखेरच्या प्रवासात मिल्खा यांच्या हातात पत्नी निर्मल कौर यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते. या प्रसंगाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, अनेकांना आपल्या भावना लपवता आल्या नाहीत.
मिल्खा हे भारतीय सेनेतून निवृत्त अधिकारी असल्याने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांचा मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंगने त्यांना अग्नी दिला. दरम्यान, यावेळी त्यांची पत्नी निर्मलाही त्यांच्यासोबत शेवटच्या प्रवासात सोबत असावी यासाठी त्यांचा फोटो मिल्खा यांच्यासोबत ठेवण्यात आला होता.
दरम्यान, भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेदेखील हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला. मिल्खा यांच्या अखेरच्या प्रवासात हातात पत्नीचा फोटो दिसत आहे. हे दृश्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना खऱ्या प्रेमाची आठवण करू देईल, असे ट्विटही सेहवागने
केले आहे.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली भेट श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील एका मैदानावरच झाली. पहिल्याच भेटीत मिल्खा यांच्या मनात त्यांनी घर केले. पहिल्याच भेटीत मी तिच्या प्रेमात पडल्याची जाहीर वाच्यता मिल्खा यांनीच काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत केली होती. त्यांनी विवाह करण्याचेही निश्चित केले होते.
मात्र, या विवाहाला निर्मला कौर यांच्या घरच्यांचा विरोध होता. यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांनी मध्यस्थी केली आणि अखेर हा विरोध दूर झाला. मिल्खा यांच्या पार्थिवावर त्यांच्या पत्नीचा फोटो पाहून अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.