दूध उत्पादन म्हणजे चार आण्याची कोंबडी अन्‌…

लॉकडाऊनमुळे दूध व्यवसायाला उतरती कळा

रावणगाव – दौंड तालुक्‍यात दोन दुग्ध संकलन संघ आहेत. शेतकरी शेतीच्या जोडीला सर्वाधिक उपयुक्‍त ठरणारा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय करतात. सध्या तालुक्‍यात म्हशीच्या दुधाला 20 ते 22 रुपये तर गायीच्या दुधाला 15 ते 20 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादन म्हणजे चार आण्याची कोंबडी अन्‌ बारा आण्याचा मसाला अशी अवस्था झाली आहे.

अलीकडे म्हशींच्याही नव्या आणि ज्यादा दूध देणाऱ्या जाती विकसित झाल्या आहेत. पण म्हैस ही गायीएवढे दूध देऊ शकत नाही. गायीच्या दुधाला म्हशीच्या दुधापेक्षा कमी पैसे मिळतात. करोनाच्या संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे मात्र, शेतकरी चारबाजूने संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करीत असतात. गेल्या सहा महिन्यांत पशुखाद्याचे दर दुपटीने वाढल्याने पशुपालन व दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. पशुखाद्य दरवाढीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

जनावरांच्या चारा व्यवस्थापनाबरोबर पशुखाद्य व्यवस्थापनही महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय अपेक्षित दूध उत्पादकता जनावरांकडून निर्माण करता येत नाही. अनेक पशुखाद्यांचा वापर केला जातो. मागील तीन महिन्यांपासून दुधाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु त्याचवेळी दुधाचे दर वाढताच पशुखाद्याचेही दर वाढवण्यात आले. चाऱ्याचे हाल व त्याच्या जोडीला पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकरीवर्ग दुहेरी या कात्रीत सापडला आहे.

शेतकरी बॅंकेकडून 40 ते 50 हजार कर्ज काढून गाय, म्हैस विकत घेतात. शिवाय ती किती दूध देते याचीही आपल्याला खात्री नसते. त्यामुळे फसगत होते.

दौंड तालुक्‍यामध्ये पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ तसेच स्व. सुभाषआण्णा कुल असे सहकारी 2 दूध संघ आहेत. तसेच इतर खासगी स्वरुपाच्या अनेक कंपन्यांची दुध संकलन केंद्रे अनेक गावांमध्ये दूध संकलन करत आहेत. दररोज हजारो लिटरच्या संख्येने दुध संकलन केले जाते. दूध संकलनास फारशा अडचणी नसल्या तरी वितरणास येत असलेल्या अडचणींमुळे तालुक्‍यातील दूध वितरकांना त्याचा फटका दूध संघांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना बसत आहे.

तालुक्‍यात दुधाला प्रचंड मागणी आहे. कारण लॉकडाऊनमुळे लोक घरी बसून आहेत. व त्यांना चहासह, लहान बालकांसाठी दुधाची गरज आहे.परंतू सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मोठया शहरामध्ये दूध वितरण करण्यात अनेक अडचणी आहेत.

सतत पशुखाद्याचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे दर वाढतच आहेत. त्या प्रमाणात दुधाला कमी दर मिळत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. किमान उत्पादन खर्च तरी मिळाला पाहीजे तरच हा व्यवसाय टिकेल, अन्यथा शेतकऱ्यांचे खूप नुकसान होईल. शासनाने तरी दूध उत्पादकांचा विचार करून दुधाचे दर वाढवावेत व पशू खाद्याचे दर कमी करावेत, अशी मागणी तालुक्‍यातील दूध उत्पादकांमधून हेत आहे.

म्हणून दूध वितरण झाले कमी?
चहा टपऱ्या बंद, हॉटेल्स बंद, मिठाई उद्योग बंद, किराणा दुकान, शॉपीजमधील विक्री थंड, किराणा दुकाने लोकांच्या घरोघरी वितरण करणारी मुले आपल्या मूळ गावी गेली.

दौंड तालुक्‍यामध्ये सहकारी आणि खासगी तत्त्वावर दूध संकलन करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे कात्रज डेअरी दौंड तालुक्‍यातून 30 ते 35 हजार लिटर दूध संकलन होत आहे. लॉकडाऊन होण्याअगोदर दुधाला जास्त दर मिळत होता; परंतु तरी देखील कात्रज संघाचा बाजार इतर खासगी संस्थांच्या मानाने चांगला आहे. लॉकडाऊन नंतर दुधाचे दर वाढतील अशी आशा आहे.
– रामभाऊ टुले,
माजी अध्यक्ष, कात्रज दूध संघ.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×