एका ‘क्‍लिक’वर मिळतेय दूध

ऑनलाईन मार्केटिंग : भरघोस सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न


-अमरसिंह भातलवंडे

पिंपरी – एकेकाळी सकाळी-सकाळी दूधवाला घरी दूध घेऊन येत असे. त्यानंतर दुधाची बाटली आली आणि नंतर दुकानांमध्ये दुधाच्या पिशव्या मिळू लागल्या. आता परत काळ बदलतोय आणि दूध, दही, सारख्या दैनंदिन आवश्‍यक वस्तू थेट घरपोच येऊ लागल्या आहेत.

या सर्व वस्तू ऑनलाईन मिळत आहेत. या वस्तू घरपोच पोहचवणारे कित्येक ऍप आणि वेबसाईट्‌स मोबाईलवर रोज उघडल्या जात आहेत. सर्व प्रख्यात दूध उत्पादक डेयरींचे दूध या साईट्‌स आणि ऍपच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचवले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या ऍप आणि साईट्‌सची मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे आणि पत्रके वाटून या ऍप आणि वेबसाईट्‌सचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. सर्वांत आश्‍चर्याची बाब अशी की दूधासारख्या रिटेलर्सला अत्यल्प मार्जिन देणाऱ्या वस्तूंमध्ये हे ऍप आणि साईट्‌स एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट कशा काय देऊ शकतात? त्यामुळे बहुतेक नागरीक यावर शंका उपस्थित करत आहेत.

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातही आता कंपनीने आपल्या ऍप्लिकेशनद्वारे दूध वितरण सुरु कले आहे. या कंपन्याकडून कात्रज दूध, अमूल दूध, चितळे दूध सारख्या नामांकित कंपनीचे दूध ग्राहकांना अतिशय मुबलक दरात देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या क्षेत्रात आता “मायक्रो डिलिव्हरी स्टार्टअप’ द्वारे सुरुवात होत आहे.

ब्रेड, अंडी आणि बटर यांसारख्या इतर दैनंदिन गरजांच्या वस्तू देखील पुरवतात. नामांकित कंपनीचे दूध आपल्या वेळेनुसार आणि अल्प दरामध्ये मिळत असल्याने ग्राहकांचाही प्रतिसाद वाढू लागला आहे. ऑनलाईन दूध खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याने स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसवण्यास सुरवात झाली आहे. डेयरी व्यावसायिकांच्या दूध विक्रीमध्ये घट झाल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे आता दुधाच्या व्यवसायातही स्थानिक आणि छोट्या व्यावसायिकांना “ऑनलाईन मार्केटिंग’चा फटका सहन करावा लागणार आहे.

बड्या दूध उत्पादक कंपन्या आपल्या वितरकांना लिटरमागे एक ते दोन रुपयांचे मार्जिन देतात. दुधामध्ये रिटेलर्सला देखील अधिक मार्जिन नसते. ऑनलाईन कंपन्या घरपोच सेवा देऊन एवढी भरघोस सूट कशा देऊ शकतात? हे समजण्यापलिकडे आहे. ऑनलाईन बिझनेसने स्थानिक लहान व्यावसायिकांचे अस्तित्व धोक्‍यात आणण्यास सुरुवात केली आहे. हे स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी आणि व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी धोक्‍याचे चिन्ह आहे.
– मधुकर गायकवाड, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कंज्यूमर प्रॉडक्‍ट्‌स डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन

आकर्षक ऑफर्स

सध्या ज्या ऍप्लिकेशनद्वारे पिंपरी-चिंचवड शहरात ऑनलाईन दूध विक्री सुरू आहे. त्या ऍप्लिकेशनकडून ग्राहकांना खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन महिने दूध विकत घेतल्यानंतर दोन आठवडे फ्री दूध देण्यात येत आहे. तसेच पहिल्या तीन महिन्यांसाठी कुठल्याही प्रकारचे डिलिव्हरी चार्जेस घेण्यात येणार नाही. यासह विविध ऑफर्स दिल्यामुळे ऑनलाईन दूध खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे.

गिर गायीचे दूधही घरपोच

आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्‍त असणाऱ्या गिर गायीचे दूधही आता घरपोच देण्यासाठी काही दूध डेअरी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संबंधित कंपनीला फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ताजे गिर गाईचे दूध संबंधित ग्राहकाला घरपोच देण्यात येत आहे. अत्यंत पौष्टिक असलेल्या गिर गाईच्या दूधाचा भाव जास्त आहे.

असे होतेय घरपोच दूध

ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला दूध किती दिवसासाठी हवे आहे याची माहिती भरून घेतली जाते. त्यानंतर सकाळी पाच ते साडेसात या वेळेत संबंधित कंपनीचे लोक येऊन हे दूध घरपोच करत आहेत. पैसेही ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता घरपोच दूध मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.