मिल्क मॅन ते आयर्न मॅन…!

साताऱ्यातील अभय केळकरने खडतर स्पर्धेत पटकाविला किताब

सातारा – साताऱ्यात दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अभय केळकर याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर जागतिक दर्जाच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रविवारी 30 जून रोजी अभयने सायकलिंग, रनिंग व स्विमिंग अशी 226.7 किलोमीटरची अवघड व खडतर स्पर्धा पस्तीसाव्या क्रमांकाने पूर्ण करत ‘आयर्न मॅन ‘ हा किताब स्वतःच्या नावावर जमा केला. अशी कामगिरी करणारा तो एकमेव सातारकर ठरला आहे.

साताऱ्यात पहाटे नागरिकांना दूध वाटप करणारा अभय केळकर तंदुरूस्तीच्या बाबतीत भयंकर जागरूक होता. प्रचंड जिद्द, आणि आंतरिक ऊर्जा या गुणांच्या जोरावर अभयने कोणत्याही साधन- सुविधांशिवाय चार मॅरेथॉन पूर्ण करत आपली इच्छाशक्ती व्यक्त केली होती. दूध वाटप व टेंम्पो चालवून दिवसाकाठी चार- पाचशे रुपये कमवणाऱ्या अभयला डोंगर दऱ्यात भटकण्याची व खेकडे पकडण्याची प्रचंड आवड आहे. मिल्क मॅन या नावे तो परिचित आहे.

निसर्गात रमणाऱ्या या पर्यावरण वेड्याने अनेक प्राण्यांचेच नव्हे तर माणसांचेही जीव वाचवले. कोयनेत पोहणे, सातारा- महाबळेश्वर- सातारा असा धावण्याचा सराव करणाऱ्या अभयने कोल्हापूरमध्ये हाफ आयर्न मॅन मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. माणदेशी महिला बॅंकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांचा मुलगा प्रभात याने अभयमधील गुणवत्ता ओळखून त्याला नॉर्वेच्या हयूगसंडच्या मुख्य आयर्न मॅनच्या शर्यतीत उतरवले.

180 किलोमीटरचे सायकलिंग, 4.6 किलोमीटर पोहणे, आणि 42 किलोमीटर धावणे हा तीन टप्प्यातला हा 226 किलोमीटरचा प्रवास जिद्दीच्या जोरावर अभयने रविवारी रात्री नऊ वाजता 14 तास 27 मिनिटांमध्ये पूर्ण केला. कट ऑफ टायमिंग 16 तास 30 मिनिटाचे होते. पन्नास देशाचे स्पर्धक या शर्यतीत सहभागी झाले होते. एक निर्भय योध्दा आणि एका मुलीचे पालकत्व ही जवाबदारी मला उर्जा आणि स्फूर्ती देते, असे सातारी बाण्याचे उत्तर अभयने नॉर्वेच्या रेडियो स्टेशनला मुलाखतीच्या दरम्यान दिले. अभयच्या या भीमपराक्रमाला सातारकरांनी मनापासून सलाम केला असून त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

मुलगी स्वराला मला बॉक्‍सर बनवायचे आहे. तिचा रोल मॉडेल बनण्यासाठी मी आयर्न मॅन बनल्याचे भावनिक उत्तर अभय केळकर यांनी दिले. अभयच्या या वाटचालीत प्रभात सिन्हा व माणदेशी परिवार, स्व. डॉ. लेले, कन्हैयालाल राजपुरोहित व शिवाजी उदय मंडळाचे मोलाचे सहकार्य राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.