पुणे – महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला आणि संपूर्ण मानवतेला प्रेरणा दिली. आधुनिक काळात शांतता टिकवण्यासाठी लष्करी ताकदीसह विचारशीलतेची गरज आहे. त्यासाठी आर्थिक ताकद वाढविणे गरजेचे आहे, असे मत ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व वॉशिंग्टन डी.सी. येथील बे अटलांटिक विद्यापीठातील प्रा. पाओलो वॉन शिराक यांनी व्यक्त केले.
डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ (एडीवायपीयू) आणि ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूट (जीपीआय) वॉशिंग्टन डी.सी. यांच्यात रणनीतिक भू-राजकीय अभ्यासाच्या क्षेत्रात शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. रणनीतिक भू-राजकीय आणि सुरक्षा मुद्दे या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान हा करार करण्यात आला.
डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन, भू-राजकीय तज्ज्ञ डॉ. निशिकांत ओझा आदी उपस्थित होते. या करारांतर्गत एडीवायपीयू – जीपीआय चॅप्टरची स्थापना करण्यात आली असून यात संयुक्त संशोधन उपक्रम, शैक्षणिक देवाणघेवाण, विशेष अभ्यासक्रम आणि कार्यशाळांचा समावेश असणार आहे.
हा सामंजस्य करार जागतिक सहकार्याचे प्रतीक आहे. या करारामुळे संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांना जागतिक प्रश्नांवर विचारमंथन आणि संशोधनाची संधी मिळेल, असे मत डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले आहे.
जीपीआय सोबत झालेला हा करार एक ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना जागतिक भू-राजकीय अभ्यासात नवे दृष्टिकोन मिळतील, असे डॉ. राकेश कुमार जैन यांनी सांगितले. एडीवायपीयू – जीपीआय यांच्यातील भागीदारी विचारशक्तीला चालना देणारी आणि जागतिक पातळीवर समस्या सोडवण्याची मोठी संधी निर्माण करणारी आहे, असे डॉ. निशिकांत ओझा यांनी सांगितले आहे.