नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर काही महिन्या पूर्वीच अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातील युद्धाचे सावट उमटले होते. मात्र ही मोठी घडामोड घडल्यानंतर आता जगात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सुदानचे पंतप्रधान अब्दुल्लाह हामडोक यांना आज तिथल्याच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी कैद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुदानमधील अल हादत या वृत्तवाहिनीने त्यांच्या सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी हे बंड का पुरकारले आहे आणि नक्की या मागील कारण काय आहे याबद्दलची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही. या बातमीला इतर कोणत्याही सरकारी किंवा इतर संस्थांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला मिळालेल्या माहितीनुसार लष्करामधील काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांच्या घरी बळजबरीने प्रवेश करत त्यांना ताब्यात घेतल्याचे सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
देशातील इतर मंत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे यात औद्योगिक मंत्री इब्राहिम अल शेख आणि सुदानची राजधानी असणाऱ्या खार्तुमचे राज्यपाल आयमन खलिद यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. इतर अनेक सरकारी पदाधिकाऱ्यांनाही लष्कराने ताब्यात घेतलं आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी असोसिएट प्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारच्या प्रवक्त्यांना लष्कराने ताब्यात घेतलं आहे.