कराड – सैन्यदलातील कार्यरत असलेले वडगाव हवेली, ता. कराड येथील जवान अनिल संभाजी जगताप (वय 40) यांची महिंद्रा स्कार्पिओ गाडी खरेदीमध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. जगताप यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात पवनकुमार पांडे (रा. नवी दिल्ली) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल जगताप हे भारतीय लष्कराच्या 5271-एससी बटालियनमध्ये कार्यरत आहेत. जून महिन्यात ते रजेवर गावी आले होते. यावेळी त्यांना ओएलएक्स मोबाइल ऍपद्वारे महिंद्रा स्कॉर्पिओ (डीएल-10-सीटी-0770) गाडीची माहिती मिळाली होती. त्यांनी गाडीचा मालक पवनकुमार पांडे याच्याशी व्यवहाराची बोलणी केल्यावर पांडेने जगताप यांच्या फोनवर गाडीच्या कागदपत्रांचे फोटो पाठवले.
त्यावेळी गाडीचा व्यवहार 2 लाख 30 हजार रुपयांना ठरला होता. जगताप यांनी 14 जून रोजी स्टेट बॅंकेच्या खात्यातून एक लाख 12 हजार 120 रुपये पांडेच्या खात्यावर जमा केले. उर्वरित एक लाख 17 हजार 880 रुपये गाडी मिळाल्यानंतर देण्याचे ठरले. त्यानंतर पांडेने जगताप यांना सारखे फोन करून बाकीच्या पैशांसाठी तगादा लावला. मात्र, पांडेने गाडी पाठवली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे जगताप यांनी पांडे याच्या विरोधात तक्रार दिली आहे.