… अन् जमिनीचा ताबा घेण्यासाठी आली मिलिटरी

राजगुरूनगर – गुळाणी (ता. खेड) येथे एका जमिनीच्या ताब्यासाठी चक्‍क मिलिटरी आल्याने एकच खळबळ उडाली. गुळाणी येथील दोन शेतकऱ्यांमध्ये जमिनीचा वाद आहे. या वादातून अनेकदा भांडणे झाली आहेत. हे भांडण येथील दिवाणी न्यायालयात सुरू आहे. जमीन विकलेल्या खरेदीदार व मूळ शेतकरी यांच्यात वाद असल्याचे समजते.

गुळाणी येथे शनिवारी (दि. 15) जमीन मशागत करताना मुळशी येथील जमीन खरेदीदार व गुळाणी येथील शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. दोन्ही बाजूने खेड पोलिसांत परस्पर तक्रारी दिल्याने दोन्ही गटावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा तपास सुरू असतानाच शनिवारी (दि.22) सकाळी 11वाजण्याच्या सुमारास गुळाणी मधील स्थानिक शेतकऱ्याच्या मिलिटरी मधील भावाने नाशिक येथून चार मिलिटरी वाहनांमधून जवळपास 50 ते 70 मिलिटरी जवान आणल्याने एकच खळबळ उडाली आहे. अचानक गावात आलेल्या मिलिटरी जवानाच्या गाड्या आणि बंदूकधारी जवान आल्याने गावात तणावाचे वातावरण पसरले होते. या जवानांच्या माध्यमातून संपूर्ण शेताला वेढा घालून ताबा घेत चार ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने शेत नांगरण्यात आले. याबाबत अद्यापपर्यंत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही मात्र, गुळाणी गावात दहशत पसरली आहे. गावात आलेल्या मिलिटरीच्या सुमारे 70 जवानांनी संबंधित जमिनीचा ताबा घेतल्याने नागरिकांना येथे “मिलिटरी राज’चा अनुभव आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)