अलीकडेच कोविड-19 मधून बरा झालेला मिलिंद सोमण सध्या पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात आणि नैसर्गिक राहणीमानात राहतो आहे. सोशल मीडियावर तो नेहमी आपल्या या नैसर्गिक राहणीमानाबाबत अपडेट देत असतो.
त्याने आपल्या व्यायामाचे आणि नैसर्गिक राहणीमानाचे काही व्हिडिओ आणि फोटोही अपलोड केले आहेत. ताणतणावांपासून दूर राहण्यासाठी तो सर्वप्रकारच्या गॅजेटपासून जाणीवपूर्वक दूर राहतो आहे. मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट सर्वांपासून दूर राहून तो एका तळ्याच्या काठावर व्यायाम करत असल्याचे अलीकडेच अपलोड करत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते आहे.
रविवारी आपण कोणत्याही प्रकारचे गॅजेट वापरायचे नाही. रविवार हा पूर्णपणे गॅजेट मुक्त दिवस असेल, असेच आपण ठरवलेले होते. त्यानुसार तब्बल 36 तास सर्वप्रकारच्या गॅजेटपासून दूर राहिल्याचे त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. यावेळी त्याच्याबरोबर फक्त एक टरबूज होते. दिवसभर तो या टरबुजाच्या आधारेच राहिला होता. ताणतणावाचा आपल्या प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून ताण घालवण्यासाठी असा प्रयोग आवश्यक असल्याचेही मिलिंद सोमणने म्हटले आहे.