नवी दिल्ली – बऱ्याच नागरिकांना कलर ब्लाइंडनेस असतो. त्यांना विशिष्ट रंग दिसत नाहीत. कलर ब्लाइंडनेसचे प्रमाण जर मध्यम किंवा कमी असेल तर आगामी काळात अशा नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना मिळणार आहे.
याबाबत तज्ज्ञांशी विचारविनिमय करण्यात आला. त्यावेळी मध्यम स्वरूपाचे कलर ब्लाइंड असणाऱ्यांना परवाना देण्यास हरकत नाही, अशी शिफारस मिळाली आहे. त्याचबरोबर जागतिक परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. त्या आधारावर अशा नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येणार असल्याचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.
यासंदर्भात एक परिपत्रक काढून संबंधित अर्जामध्ये दुरुस्त्या करण्यास सांगण्यात आले आहे.दिव्यांग व्यक्तींना जास्तीत जास्त प्रमाणात नियमित कामे करता यावीत असा सरकारचा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनातून हा पुढाकार घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
यासंदर्भात कलर ब्लाइंडनेस असलेल्या बऱ्याच नागरिकांनी आणि अशा नागरिकासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी अशा नागरिकांना वाहन परवाना वाहन चालविण्याचा परवाना मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. आता त्यांचा हा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे त्यांना वाहन चालवताना अडचणी येणार नाहीत.