सिरीज ए फुटबॉल : मिलानचा सहज विजय

मिलान :- जॅल्टन इब्राहिमोविकच्या अव्वल कामगिरीच्या जोरावर मिलानने सासुओलो संघाचा 2-1 असा पराभव केला. या विजयामुळे मिलानने सिरीज ए फुटबॉल स्पर्धेतील आगेकूच कायम राखली आहे. 

या सामन्यात इब्राहिमोविकने 19 व्या मिनिटालाच पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यावेळी सासुओलोचा बचाव अत्यंत कमकुवत होता. पहिल्या हाफमध्ये त्यांना मिलानचे आक्रमण थोपवता आले नाही. मिलानने गोल करण्याच्या अनेक संधी स्वतःच्याच चुकांमुळे वाया घालवल्या. याचा लाभ घेत सासुओलोच्या फ्रान्सिस्को कॅपिटो याने 42 व्या मिनिटाला गोल केला व संघाला सामन्यात बरोबरी मिळवून दिली.

मात्र, त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. पहिल्याच हाफमधील वाढीव वेळेत मिलानने आणखी एक गोल केला व पुन्हा एकदा आघाडी घेतली. या गोलचा शिल्पकारही इब्राहिमोविकच ठरला. त्याने जादा वेळेत 47 व्या मिनिटाला गोल केला व संघाला पुन्हा एकदा आघाडी प्राप्त करून दिली. सासुओलो संघाला त्यानंतर संपूर्ण सामन्यात एकदाही मिलानचा बचाव भेदता आला नाही. मेहदी बोराबियाला रेफ्रींनी दोन पिवळी कार्ड दिल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे सासुओलो संघाला संपूर्ण दुसरा हाफ 10 खेळाडूंमध्येच खेळावा लागला.

या विजयामुळे मिलानने स्पर्धेत आगेकूच केली व 35 सामन्यांतून 59 गुणांची नोंद करत गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.