पुणे – मुळा आणि मुठा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील दोन्ही काठांवरील परिसर जलमय झाला आहे. कालपासून नदीकाठच्या 5 हजारांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केले असून, पुरात अडकलेल्या 637 नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाउस होत आहे. खडकवासला धरणातून 27 जुलैपासून पासून मुठा नदीत विसर्ग सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खडकवासलासह टेमघर, पानशेत, वरसगाव धरण भरल्याने खडकवासला धरणातून 45 हजार क्युसेक विसर्ग मुठा नदीत सुरू आहे. तर मुळशी आणि पवना धरणही भरल्याने अनुक्रमे मुळा आणि पवना नदीत पाणी सोडण्यात येत आहे. मुळा आणि पवनेचा संगम बोपोडी, तर या दोन्ही नद्यांचा आणि मुठेचा संगम संगमवाडी येथे होत आहे. पिंपरी-चिंचवड तसेच पुणे महापालिकेच्या हद्दीतील वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरले आहे प्रामुख्याने विश्रांतवाडीतील शांतीनगर, येरवडा, ताडीवाला रोड झोपडपट्टी, मंगळवार पेठ, कामगार पुतळा झोपडपट्टी, पाटील इस्टेट, सिंहगड रस्ता, शिवणे, बाणेर, बालेवाडी येथील नदीकाठच्या वसाहतींना पुराचा फटका बसला.
6 पूल बंद
बचाव कार्यासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ तुकडी तैनात करण्यात आली आहे. पुरामुळे शहरातील 6 पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. औंध- राजीव गांधी पूल, स्पायसर कॉलेज मार्गावरील जुना सांगवी पूल, दापोडी पूल, खडकी बाजार ते साप्रस मार्गावरील जुना होळकर पूल, डेक्कन येथील भिडे पूल, मनपा समोरील टिळक पूल या पुलांवरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. तर, औंध येथील शिंदे पूल सायंकाळी सुरू करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
637 जणांचा जीव वाचवला
मागील आठवडाभरात शहरात झाडे पडण्याच्या 54 घटना घडल्या असून जुन्या घरांच्या अथवा वाड्यांच्या भिंती कोसळण्याच्या 10 घटना घडल्या आहेत. मागील दोन दिवसांत नदीकाठची 35 घरे पाण्याखाली गेली असून 637 नागरिकांना तसेच 17 जनावरांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढल्याची माहितीही महापौरांनी दिली.