कराड – आगाशिवनगर झोपडपट्टीमधील संभाव्य धोका टाळण्यासाठी मलकापूर नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने 13 कुटुंबांचे जिल्हा परिषद शाळा क्र. 2 या ठिकाणी स्थलांतर केलेले आहे.
या ठिकाणी नगरपरिषदेने सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून स्थलांतरित कुटुंबांच्या जेवण व नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. तसेच या कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, सागर जाधव व नगरसेविका यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
आगाशिवनगर झोपडपट्टी डोंगर उतारावर असून टप्पा क्र. 3 लगत एकूण 13 कुटुंबे राहत आहेत. जोरदार पावसाने डोंगर पाझरुन झोपड्यांना नुकसान होण्याची शक्यता असल्याने या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद शाळा क्र. 2, आगाशिवनगर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
याबरोबरच मलकापूर नगरपरिषदेने संभाव्य कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ विचारात घेता शहराचा पाणीपुरवठा बंद केला असून, यासाठी पर्यायी उपाय योजना म्हणून सार्वजनिक बोअरवेलच्या माध्यमातून टॅंकरद्वारे आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू ठेवलेला आहे. तसेच ज्या नागरिकांच्याकडे बोअरवेलचे पाणी उपलब्ध आहे अशा नागरिकांनी आपल्या परिसरातील कुटुंबांना पाणी उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.