-विनोद मोहिते
इस्लामपूर (प्रतिनिधी) – पुण्यात जेवणाचे हाल आणि कोरोनाची भीतीने आपला गाव बरा म्हणत चालक असणाऱ्या युवकाने इस्लामपूरचा रस्ता धरला. पाच दिवस तो चालत राहिला. लॉकडाऊन नंतर तब्बल दीड महिन्याने घरी येणार होता. नेर्ले गावाजवळ आल्यावर त्याने घरच्यांना संपर्क केला. मी येतोय..अन् घरातून प्रत्युत्तर आले, तू येतोस गल्लीतील लोक दंगा करतील.
काही वेळात युवकांच्या मावशीने महामार्गावर धाव घेतली. तो रस्त्याकडे झाडाखाली विसावला होता. दरम्यान महामार्गाकडेला एकजण चक्कर येऊन पडल्याची माहिती प्रशासनाला लागताच प्रशासनाची धावाधाव झाली. तेथून त्याला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. होम क्वारंटाइनचा शिक्का असल्याने त्याला कोठे ठेवायचे हे प्रशासन ठरवेल. याबाबत माहिती देताना आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील म्हणाले ,”त्या युवकांला अशक्त पणा असल्याने त्याला सलाईन लावले आहे. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे सध्या दिसून येत नाहीत.”
याबाबत माहिती अशी, शहरातील एका उपनगरात राहणारा युवक पुणे येथे ट्रान्सपोर्ट व्यवसायात वाहन चालक आहे. वाहतूक बंद झाल्याने तो पुण्यात होता. लॉक डाऊन दरम्यान जेवण व राहण्याचे प्रचंड हाल झाले. आता गावाकडे जावू म्हणत त्याने पुणे बेंगलोर महामार्गाचा रस्ता धरला. गेल्या चार-पाच दिवसांपासून तो चालत होता.
रात्री उशिरापर्यंत चालायचे.. दिवसा विश्रांती घ्यायची असा नित्यक्रम होता. रस्त्याने कोणी दिलं ते खायचे प्रसंगी उपाशी पोटी चालत होता. रात्री झोपताना बंद ढाब्याचा आवार उपयोगात आणत आज शुक्रवारी तालुक्यात प्रवेश केला. नेर्ले गावाच्या हद्दीत आल्यावर आनंदाने घरी संपर्क साधला. मी येतोय असे सांगितले. अन् घरात आला तर गल्लीत दंगा होईल.तू कशाला येतोय असे आईने सुनावले आणि केदारवाडी येथील आपल्या बहिणीला ही माहिती दिली. तातडीने त्या युवकाच्या मावशीने महामार्गावर धाव घेत शोधाशोध केली. तेव्हा तो युवक झाडा खाली विसावला होता.
काही वेळात काळमवाडी ते नेर्ले दरम्यान एक युवक चक्कर येवून पडल्याची माहिती लोकप्रतिनिधीसह इस्लामपूरच्या नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांना माहिती दिली. दरम्यान त्या युवकाला प्रशासनाने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संबंधित युवकाला मोबाईल वरून संपर्क साधला असता सुखरूप असल्याचे सांगितले.