मध्यरात्री पीएमपीचे प्रवासी रस्त्यावर

फुगेवाडी चौकात गॅस संपल्याने एक तास प्रवासी ताटकळले

पिंपरी – रात्रीचे बारा वाजले होते… बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना लवकर घरी जायची घाई होती… परंतु अचानकच फुगेवाडी चौकात बस बंद पडली आणि मध्यरात्री कित्येक प्रवासी रस्त्यावर ताटकळत उभी राहिली. बस बंद पडण्याचे कारण कोणताही तांत्रिक बिघाड नसून बसमधील गॅस संपल्याने बस रस्त्यात बंद पडली होती. आश्‍चर्याची बाब म्हणजे चालक-वाहकांकडे निगडी आगाराचा फोन नंबर देखील नव्हता. प्रवाशांनी दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीशी संपर्क साधल्यानंतर दैनिक “प्रभात’ने आगार प्रमुखांना फोन करुन हा प्रकार सांगितला. त्यानंतर दुसरी बस पाठवण्यात आली.
पीएमपी बसेसची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे.

रात्रीच्या फेऱ्या करणाऱ्या बसमध्ये पुरेसा गॅस आहे का? बस योग्य अवस्थेत आहे का? हे पाहण्याची तस्दी देखील संबंधित घेत नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. गुरुवारी (दि.25) रात्री बारा वाजता स्वारगेट पीएमपी आगाराची बस क्रमांक एम.एच. 12 एच.बी 1633 या क्रमांकाची बस निगडी आगारातून अप्पर-डेपो साठी निघाली. बसमध्ये 35 प्रवासी होते, त्यात काही महिला प्रवासी देखील होत्या. मात्र, फुगेवाडी चौकातच गॅस संपल्याने प्रवाशांना मध्यरात्री रस्त्यावर उभे रहावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे बसच्या चालक- वाहकांकडे निगडी आगाराचा फोन क्रमांक देखील नव्हता. तेव्हा, एका प्रवाशाने दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीस संपर्क केला. दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने निगडी आगार प्रमुखांना संपर्क करुन मध्यरात्री बस बंद पडल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री एक वाजता दुसरी बस आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.