शहरातील मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यांवर सेवा
पुणे – शहरातील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) अरुंद रस्त्यांवर गर्दीच्या वेळेस मिडी बसचे सेवा सुरू केली आहे. पीएमपीच्या या नवीन योजनेत 50 मिडी बस असून प्रवाशांना केवळ 10 रुपयात दिवसभर मिडी बसने प्रवास करता येणार आहे. ही योजना 20 एप्रिल 2020 ते 21 मार्च 2021 या एक वर्षासाठी असणार आहे.
मध्यवर्ती भागात अरुंद रस्ते असल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या मार्गांवर जास्त रुंदीची एखादी बस ब्रेकडाऊन झाल्यास वाहनांच्या रांगा लागतात. तसेच, ब्रेकडाऊन बस बाहेर काढण्यासाठी पीएमपीला कसरत करावी लागते. यामुळे, पेठांमधील अरुंद रस्त्यावर मिडी बस सोडण्यात येणार आहे. या मिडी बससाठी केवळ दहा रुपये भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजनेतील तूट दरमहा पुणे महापालिकडून देण्यात येणार आहे.
या बसचा मार्ग ठराविक, रुटबोर्डही वेगळा राहणार या योजनेतील मिडी बसचा मार्ग ठराविक राहणार आहे. तसेच, सदर बसेसची रंगसंगती व रुट बोर्ड वेगळा राहणार असल्याने प्रवाशांना समजण्यास सोपे जाणार आहे. या बससाठी मासिक पास ठेवण्याबाबतही विचाराधीन आहे. पालिकेच्या मान्यतेने ही योजना सुरू होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.