नवी दिल्ली – भारतातील मध्यम वर्ग गेल्या दहा वर्षापासून घसरत असलेल्या उत्पन्नाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत मध्यमवर्ग कर्ज काढून आपल्या जगण्याचा दर्जा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ही परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत जात असल्याचे मर्सेलस इन्व्हेस्मेंट मॅनेजर्स या कंपनीचे प्रमुख सौरभ मुखर्जी यांनी नमूद केले आहे. ज्या मध्यमवर्गीयांनी कर्ज किंवा अनेक कर्जे घेतली आहेत, त्यातील दहा टक्के लोक संबंधित कर्ज कधीही फेडू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे.
उत्पन्न वाढेना महागाई वाढली
मध्यमवर्गांची परिस्थिती विदारक होण्यास एक नाही तर तीन प्रमुख कारणे आहेत. एकूणच त्यांच्या उत्पन्नात फारसे वाढ होत नाही. पगार वाढ होत नाही. आणि नव्या तंत्रज्ञानामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. त्यांच्या कडेवारीनुसार दहा वर्षांपूर्वी मध्यमवर्गाचे उत्पन्न साधारणपणे वर्षाला 10 लाख 5 हजार रुपये होते. या उत्पन्नात वाढ झालेली नाही. मात्र महागाईमुळे या उत्पन्नाची क्रयशक्ती निम्मी झालेली आहे. यामुळे हा वर्ग कर्जाच्या चक्रविवाहात अडकत चालला आहे.
माणसाच्या जागी यंत्र
दहा वर्षात माणसाच्या जागी यंत्राने काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्रातही होत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास बँकातील कर्मचार्यांची जागा एटीएमने घेतली आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता विविध क्षेत्रात धुमाकूळ घालणार असल्यामुळे वाईट कॉलर आणि ब्ल्यू कॉलर रोजगारात घट होणार आहे.
मंदीचे निरंतर चक्र
जागतिकीकरण, नैसर्गिक आपत्ती, इत्यादी कारणामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मंदीचे चक्र चालू आहे. जागतिक मंदी, करोना, जागतिक व्यापार युद्ध, विविध देशांदरम्यानचे संघर्ष या कारणामुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊन मध्यमवर्गाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. अनेक वर्षापासून महागाईच्या तुलनेत कमी असलेली पगार वाढ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मंदी मर्यादित काळ राहत असली तरी रोजगाराची कमतरता, मर्यादित पगारवाढ, इत्यादी विषय पुढील दहा वर्षात भारतातील मध्यमवर्गावर प्रचंड परिणाम करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.