एमआयडीसीतील उद्योजक कचऱ्यामुळे त्रस्त

रस्त्यावरच वर्गीकरण ः आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील प्रकार

चिंचवड – चिंचवड एमआयडीसीतील एच. ब्लॉक येथील उद्योजक कचऱ्यामुळे तर कामगार मोकाट कुत्र्यांमुळे हैराण झाले आहे. रस्त्यावरच कचऱ्याचे वर्गीकरण होते. त्यामुळे परिसरात कचरा अस्ताव्यस्त पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे.

महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानाजवळच गेली अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आशिया खंडातील श्रीमंत महापालिका गणली गेली ती लघु, मध्यम, मोठ्या उद्योग व्यावसायिकांमुळे आयुक्तांच्या निवासस्थानालगतच असलेल्या एच. ब्लॉक मधील गारलॉक कंपनीसमोर अजमेरा परिसर, मोरवाडी, अमृतेश्‍वर कॉलनी, एम्पायर इस्टेट आदी परिसरातील कचरा महापालिकेच्या घंटागाडीद्वारे गोळा केला जातो.

हा कचरा एच. ब्लॉक मधील गारलॉक कंपनीच्या सीमाभिंतीलगत असलेल्या कचरा कुंडीमध्ये टाकला जातो. या परिसरात फोर्ब्ज मार्शल, इंडस्ट्रीयल प्रोडक्‍टस्‌, एसीई मेटल, एस. एम. ऑटो, सिंगानिया प्रा. लि. आदी लघु उद्योग आहेत. शेकडो कामगार याठिकाणी काम करतात. दुर्गंधी व रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचरा वेचक रस्त्यावरच कचऱ्याचे वर्गीकरण करतात. त्यामुळे कचरा अस्ताव्यस्त पसरतो.

कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. भटक्‍या श्‍वानांनी याठिकाणी ठिय्याच मांडला आहे. याठिकाणी ये-जा करणाऱ्या कामगारांवर श्‍वान हल्ले करतात. याठिकाणी पथदिव्यांची सोय नसल्यामुळे जीव मुठीत धरुन कामगारांना वावरावे लागते. कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यानंतर कचरा मोठ्या वाहनातून कचरा डेपोपर्यंत नेला जातो. परंतु, तोपर्यंत हा कचरा परिसरात पसरतो. याठिकाणी उघडे गटर आहे. ते देखील कचऱ्याने भरले आहे. पावसाळ्यात कचऱ्याची समस्या अधिकच तीव्र होते. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी याठिकाणी पाहणी करुन त्वरीत योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.