मायक्रोफिल्म : मात

माधुरी तळवलकर

नवीन काळाने जुन्या काळावर केलेली मात! जुन्या काळातला खानदानी वाडा. त्यात एकटी सत्तरीची आज्जी राहतेय. शहरातून तिची मुलगी स्वतःच्या दोन मुलींना घेऊन आपल्या आईला भेटायला येते. त्यातली मोठी मुलगी अगदी आजीसारखीच. हुशार, आत्मविश्‍वास असलेली. आज्जी एकटी राहून वैतागलेली. शिवाय, ही काय नवीन पिढी… ह्यांना कशाचीच किंमत नाही, असा काहीसा भाव.

एक मस्त इंग्लिश गाणं लावून त्यावर ती दहा वर्षांची नात पाश्‍चात्य पद्धतीचं नृत्य करते. साऱ्यांना आवडतं पण आज्जी तिला दोन रुपये देते आणि म्हणते, दोन रुपयांची अक्कल मिळाली तर घेऊन ये. ती हिरमुसली होते. आज्जी रफी, गीता दत्त यांची गाणी ग्रामोफोनवर ऐकायला लागते. ते पाहून दुसरी नात आज्जीला कारवॉं नावाचे इन्स्ट्रुमेंट दाखवते आणि म्हणते, ही जुनी गाणीपण आम्ही यावर ऐकतो. जपून ठेवलेल्या ग्रामोफोनलाही पर्याय आहे हे कळल्यावर आज्जीचा जरा विरसच होतो.

एकदा नात आज्जीला सांगते, तिला 540 मित्रमैत्रिणी आहेत. आम्ही भरपूर गप्पा मारतो. तिला नवल वाटतं. मग नात सांगते की, आम्ही एफबीवर (फेसबुकवर) भेटतो. आज्जीला आपला एकटेपणा आणखीच टोचतो. आज्जी बुद्धिबळाचा पट काढून बसते. तिथेच तिचा करंडक ठेवते.

नात साहजिकच तिला विचारते. तेव्हा आज्जी अभिमानाने सांगते की, माझ्या वडिलांनी मला बुद्धिबळ शिकवला होता. अख्ख्या गावात मला हरवणारं कुणी नव्हतं. तेवढ्यात दुसरी नात तिथे येते आणि म्हणते, “आज्जी, हिला नुकतंच मोठं बक्षीस मिळालं बुद्धिबळात. तुझीच विद्या आली असणार तिच्याकडे.’ आज्जी थक्‍क! नवीन पिढीपुढे आज्जीला आपलं वेगळं स्थान, महत्त्व ठसवता येतच नाहीय. ती अस्वस्थ होते.

धाकटी नात तिला विचारते, तू एकटीच राहतेस? आजोबा कुठायेत? आज्जी म्हणते, त्यांना दुसरी एक आवडली. ते गेले तिच्याकडे. जाऊ दे. तुम्हाला काय कळणार नातेसंबंध कसे जपायचे… मी म्हणून टिकून राहिले. नात निरागसपणे म्हणते, “पण बाबा असे वागले तेव्हा आईने त्यांना सोडून दिले. ती तर म्हणते, जिथे मान नाही, आदर नाही, तिथं राहण्यात मतलब नाही. आम्ही आईबरोबर दुसऱ्या एका लहान घरात राहतो.’ आज्जीचे डोळे खाडकन उघडतात. आपण एवढी शेखी मिरवतोय पण आपले स्थान काय? तिला कळते की, ह्यांचीही काही तत्त्वे आहेत, अभिरुची आहे.

आपला जावई आपल्या नवऱ्यासारखाच वागला पण आपल्या स्वाभिमानी मुलीने वेगळे घर घेतले. मुलींवर चांगले संस्कार केले. हळूहळू दोन्ही-तिन्ही पिढ्या एकमेकींना जाणून घेतात. स्पष्टपणे काहीही न बोलता, पिढ्यांमधले अंतर कसे मिटत जाते हे या फिल्ममध्ये सूचकपणे सांगितलेले आहे. ते मर्म प्रगल्भपणे समजावून घेताना एक उत्तम कलाकृती पाहिल्याचा आपल्याला आनंद मिळतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.