#फोटो गॅलरी: मिकी माऊस @९१

मध्यंतरी फेसबुक वर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक लहान मुलगी तिच्या आई वडिलांसोबत बागेत येते. तिथे आल्यावर तिला मिकी माऊस दिसतो. आधी थोडीशी हिरमुसलेली ती मुलगी मिकी माऊसला पाहून खूपच खुश होते. त्या मुलीच्या चेहऱ्यावरील भावच बदलून जातात…ती लहान मुलगी मिकी माऊसला जाऊन अलगद बिलगते.

मिकी माऊस या नावाची जादू गेली ९१ वर्ष अशीच सुरू आहे, हेच यावरून सिद्ध होते. यंदा १८ नोव्हेंबर २०१९ रोजी मिकी माऊस ९१ वर्षांचा होतोय. १८ नोव्हेंबर १९२८ रोजी स्टीमबोट विली या चित्रपटातून मिकी माऊस सर्वप्रथम सगळ्यांसमोर आला होता.

गेली तब्बल ९१ वर्ष मिकी माऊस हे कार्टून लहान मुलांना आपलंस वाटतंय. या कार्टूनने संपूर्ण जगभरातील लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही त्याचा लळा लावलाय. वाढदिवसाच्या केक पासून ते लहान मुलांच्या कपड्यांवर आजही मिकी माऊस आपल्या सर्वांशी जोडलेला आहे. १९२८ साली वॉल्ट डिस्ने यांना त्यांची कंपनी चालवण्या करीता एका नवीन कार्टून कॅरेक्टर ची गरज होती.

त्यांच्याकडील चित्रकारांनी त्यांना गाय, बैल, घोडा, बेडूक, मांजर या प्राण्यांच्या कार्टूनचे चित्र काढून दाखवले. पण वॉल्ट यांना त्यापैकी कोणतेच चित्र आवडले नाही. असंच एक दिवस ऑफिस मध्ये बसलेले असताना वॉल्ट डिस्ने यांना एक उंदीर दिसला आणि त्यावरून त्यांना मिकी माऊस या कार्टून पात्राची कल्पना सुचली. सुरुवातीला वॉल्ट डिस्ने यांनी मिकी माऊस या कार्टूनचे नाव मॉर्टिमर असं ठेवले होते. वॉल्ट यांची पत्नी लिलियन यांना ते नाव आवडले नाही. त्यानंतर मग मिकी माऊस हे नाव दिले गेले.

‘कार्निवल किड’ या चित्रपटात मिकी माऊसने पहिला शब्द बोलला होता, ‘हॉटडॉग’ आणि त्यानंतर मिकी माऊस हे कार्टून पात्र जगातील पहिले बोलणारे कार्टून म्हणून ओळखले जाऊ लागले. १९४६ पासून डिस्ने कंपनीतील संगीतकार आणि अभिनेते जिमी मॅक डॉनल्ड यांनी मिकी माऊस साठी आवाज दिला.

सुरुवातीला कृष्णधवल असणारे मिकी माऊसचे कार्टून १९३५ साली रंगीत स्वरूपात सादर करण्यात आले. मिकी माऊसला सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्करची १० नामांकने मिळाली होती. त्यापैकी ‘लेंड अ पॉ’ या फिल्मला बेस्ट ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म हा ऑस्कर पुरस्कार १९४२ साली मिळाला होता.

बच्चे कंपनीचा मोस्ट फेव्हरेट असा हा मिकी माऊस यंदा १८ नोव्हेंबर २०१९ रोजी ९१ वर्षांचा होतोय. मिकी माऊस हे कार्टून इथून पुढेही भरपूर वर्ष लहान मुलांना आवडत राहील, कारण मिकीच्या चेहऱ्यावरील तजेलदार असं हास्य सर्वाना नेहमीच आपलंस करत राहील. त्यानिमित्ताने युट्यूब वर जाऊन मिकी माऊसचे एक कार्टून नक्की बघा. मिकी माऊसला वाढदिवसाच्या आभाळभरून शुभेच्छा!!!

– अमोल ज्ञानेश्वर कचरे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)